डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 18:29 IST2025-06-24T18:28:26+5:302025-06-24T18:29:30+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला इराणवर बॉम्ब हल्ला न करण्याचे आवाहन केल्यानंतर काही तासांतच हे स्फोट झाले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
इराणची राजधानी तेहरानमध्ये मंगळवारी दोन मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. मिझान वृत्तसंस्था आणि शार्ग वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायललाइराणवर बॉम्ब हल्ला न करण्याचे आवाहन केल्यानंतर काही तासांतच हे स्फोट झाले आहेत. मंगळवारी जाहीर झालेल्या युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हे आवाहन करण्यात आले होते.
इराणच्या एतेमाद आणि मिहान या वृत्तपत्रांनुसार, तेहरानपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या बाबोल आणि बाबोलसर शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. या भागांमध्ये हवाई संरक्षण प्रणाली (Air Defense System) देखील सक्रिय करण्यात आली होती.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वेळापूर्वीच म्हटले होते की, इस्रायल आणि इराण या दोघांनीही युद्धविरामाच्या अटींचे उल्लंघन केले आहे. ट्रम्प यांनी प्रस्तावित केलेला युद्धविराम मंगळवारी पहाटे सुरू झाला होता, परंतु काही तासांनंतरच इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्र हल्ल्यांचा आरोप केला. इराणच्या सरकारी माध्यमांनी हे आरोप फेटाळून लावले आणि सांगितले की, त्यांनी इस्रायलवर कोणताही हल्ला केला नाही. दरम्यान, ट्रम्प यांनी दोन्ही पक्षांवर नाराजी व्यक्त करत म्हटले की, 'मी इस्रायलवरही आनंदी नाही.'
हल्ल्यांनंतर युद्धविरामाचे प्रयत्न
१२ दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या युद्धात इस्रायलने इराणच्या अणु आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ठिकाणांना लक्ष्य केले होते. इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणचे किमान १० अणुवैज्ञानिक मारले गेले, ज्यात मोहम्मद रझा सेदीघी साबेर यांचाही समावेश आहे, ज्यांच्यावर अलीकडेच अमेरिकेने प्रतिबंध लादले होते. दुसरीकडे, इराणने सोमवारी कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर हल्ला केला होता, ज्याचा कतारने निषेध केला. तुर्की आणि इजिप्तने युद्धविरामाचे स्वागत केले असले, तरी उल्लंघनाच्या बातम्यांमुळे मध्य पूर्वेत तणाव कायम आहे.