इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 14:43 IST2025-06-17T14:41:28+5:302025-06-17T14:43:54+5:30
Israel Iran conflict: इराणने इस्रायलमधील संघर्ष दिवसेंदिवस गंभीर वळणांवर पोहोचत असून, दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत.

इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
दुबई: इराणनेइस्रायलमधील संघर्ष दिवसेंदिवस गंभीर वळणांवर पोहोचत असून, दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत. सोमवारी संध्याकाळी इस्रायलने पुन्हा एकदा इराणवर हवाई हल्ला केला. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर बॉम्ब टाकले. हल्ल्याच्या वेळी एक महिला अँकर लाइव्ह शो करत होती. सुदैवाने ती या हल्ल्यात बचावली. या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून त्यामध्ये अँकरला स्टुडिओतून पळताना दिसते.
पंतप्रधान बेंझामिन नेतान्याहू यांनी इस्रायल विजयाच्या मार्गावर असल्याचे नमूद करून तेहरानच्या हवाई क्षेत्रावर इस्रायलचे नियंत्रण असल्याचे म्हटले आहे. इराणकडून आण्विक व क्षेपणास्त्र हल्ल्यांचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने इस्रायलची आगेकूच सुरू असल्याचा दावा संरक्षण मंत्री काट्झ आणि लष्करप्रमुख जमीर यांनी केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला असून, ते जी-७ शिखर परिषदेत म्हणाले की, इराण हे युद्ध जिंकणार नाही. खूप उशीर होण्यापूर्वी इराणी सरकारने वाटाघाटी कराव्यात. यादरम्यान, इराणशी लागून असलेल्या सीमा पाकिस्तानने बंद केल्या आहेत.
अमेरिकी दूतावास इमारतीचे नुकसान
तेल अवीवमधील अमेरिकी दूतावासाच्या इमारतीचे किरकोळ नुकसान झाल्याचे अमेरिकी राजदूत माईक हकाबी यांनी सांगितले. या हल्ल्यांत कोणीही जखमी झाले नसल्याचे हकाबी म्हणाले.
तेहरान सोडा: इस्रायल
इस्रायलच्या लष्कराने इराणची राजधानी तेहरानमधील लोकांना वस्त्या सोडून जा, असा इशारा दिला आहे. या शहरातील लष्करी ठिकाणांवर हल्ले केले जातील, असे लष्कराने बजावले. तेहरानमध्ये अनेक भागांत स्फोट झाले आहेत. इराण व इस्रायलमधील संघर्षात दोन्ही बाजुंनी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत. इराणने इस्रायलमधील तेल अवीव शहराला टार्गेट करत हल्ले केल्याने येथे अनेक स्फोटांचे आवाज येत आगीचे लोळ बाहेर पडत आहेत. इराणकडून तेल अवीव येथे सतत हल्ले होत असल्याने नागरिक पार्किंग गॅरेजमध्ये आश्रय घेत आहेत. यावेळी एक महिला बाळाला पोर्टेबल पंख्याने हवा घालताना दिसत आहे.
इराणमध्ये आण्विक केंद्रात किरणोत्सर्जन
आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा संस्थेचे संचालक जनरल राफेल मारियानो ग्रॉसी यांनी इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणचे मुख्य आण्विक केंद्र असलेल्या नतांज प्रकल्पात रेडिओलॉजिकल तसेच रासायनिक किरणोत्सर्जन झाल्याची शंका व्यक्त केली आहे. मारियानो यांच्यानुसार सध्या नतांज भागात किरणोत्सर्गाची पातळी सामान्य आहे. अजून तरी याचा नागरी वस्त्या किंवा पर्यावरणावर परिणाम झालेला नाही.
भारतीयांनो सतर्क राहा
इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी म्हटले की, इराणमधील भारतीय दूतावास तेथील स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. इराणमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थी सुरक्षित राहावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, त्यांच्या संपर्कात आहोत. काही भारतीय विद्यार्थ्यांना इराणमधील अधिक सुरक्षित ठिकाणी हलवण्याची व्यवस्थादेखील दूतावासाने केली. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, सध्याच्या स्थितीत इराणममधील सर्व भारतीयांनी सतर्क राहावे, आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, भारतीय दूतावासाच्या सोशल मीडियावरील पोस्टवर लक्ष ठेवावे आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.