आधी इराण, आता लेबनान; इस्रायलचे भीषण हल्ले, नेमका वाद काय? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 14:35 IST2026-03-04T14:29:46+5:302026-03-04T14:35:13+5:30
Israel airstrikes Lebanon: इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आता इस्रायलचे संपूर्ण लक्ष लेबनानकडे वळले आहे.

आधी इराण, आता लेबनान; इस्रायलचे भीषण हल्ले, नेमका वाद काय? जाणून घ्या...
Israel airstrikes Lebanon: मध्यपूर्वेत सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस वाढतोय. इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर आता इस्रायलचे संपूर्ण लक्ष लेबनानकडे वळले आहे. हिज्बुल्लाह या संघटनेने मिसाइल आणि ड्रोनच्या माध्यमातून इस्रायलवर हल्ले सुरू केल्यानंतर इस्रायलने लेबनानमध्ये एअर स्ट्राइक आणि सीमेजवळ लष्करी तैनाती वाढवली आहे. जाणकारांच्या मते, हा संघर्ष गाझा आणि इराणमधील तणावानंतर आता मध्यपूर्वेतील व्यापक संघर्षाचा नवा टप्पा ठरत आहे.
हिज्बुल्लाहकडून मिसाइल हल्ले
इराण समर्थित हिज्बुल्लाह संघटनेने सलग दुसऱ्या दिवशी इस्रायलवर मिसाइल डागल्याने तणाव अधिक वाढला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने दक्षिण लेबनानमध्ये जमिनीवरील सैन्य पाठवले आणि अनेक शहरांवर हवाई हल्ले सुरू केले. दोन्ही देशांच्या सीमारेषेवर झालेल्या गोळीबारामुळे संपूर्ण प्रदेश मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बेरूतमध्ये जोरदार स्फोट
बुधवारी बेरूतच्या दक्षिण भागात जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोटानंतर आकाशात लढाऊ विमाने फिरताना दिसली. इस्रायली हल्ले तीव्र झाल्याने शहरातील दक्षिण उपनगर पुन्हा एकदा संघर्षाचे केंद्र बनले आहेत. इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनानमधील 16 गावांतील नागरिकांना तात्काळ स्थलांतर करण्याचा इशारा दिला आहे. या भागात हिज्बुल्लाहच्या हालचाली वाढल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे.
दोन दिवसांत मोठे हवाई हल्ले
गेल्या दोन दिवसांत इस्रायली हवाई दल आणि जमिनीवरील सैन्याने दक्षिण आणि पूर्व लेबनानमध्ये अनेक हवाई हल्ले केले. बेरूतचे दक्षिण उपनगर, बेका व्हॅली आणि इतर भागात सतत स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार या हल्ल्यांत किमान 50 ते 52 लोकांचा मृत्यू झाला असून 150 हून अधिक जखमी झाले आहेत. या परिस्थितीत हजारो नागरिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करत आहेत.
सामान्य नागरिकांवर गंभीर परिणाम
या संघर्षाचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. हवाई हल्ल्यांच्या भीतीमुळे अनेक गावांतील लोकांनी घरे सोडली असून 28,000 हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. अनेक रस्त्यांवर गर्दी आणि वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचणे कठीण झाले आहे.
इस्रायल-लेबनॉन वाद काय आहे?
इस्रायल-लेबनान संघर्षाचा सध्याचा टप्पा 2026 च्या सुरुवातीला तीव्र झाला असला तरी त्याची मुळे ऑक्टोबर 2023 मधील हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यात आहेत. त्यानंतर इराण समर्थित हिज्बुल्लाहनेही इस्रायलवर मिसाइल आणि ड्रोन हल्ले सुरू केले. 26 नोव्हेंबर 2024 रोजी 60 दिवसांच्या युद्धविरामाचा करार करण्यात आला होता. मात्र हा करार 2 मार्च 2026 रोजी संपल्यानंतर पुन्हा संघर्ष भडकला.
मानवी संकट अधिक गंभीर
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार या संघर्षामुळे 30,000 ते 58,000 लोक विस्थापित झाले आहेत. अनेक कुटुंबे शाळा, आश्रयस्थाने किंवा रस्त्यांवर तात्पुरत्या निवाऱ्यात राहत आहेत. रोग्य सेवा, अन्न, पाणी आणि स्वच्छतेच्या सुविधांवरही मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः महिला आणि मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्र, युरोपीय देश आणि अनेक आंतरराष्ट्रीय संस्था या संघर्षाला थांबवण्यासाठी युद्धविराम आणि राजनैतिक चर्चेचे आवाहन करत आहेत. मात्र दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती लवकर शांत होण्याची शक्यता सध्या कमी दिसत आहे.