अमेरिका- इराण यांच्यातील युद्ध अटळ? मोबाईलवर आलेल्या 'त्या' मॅसेजमुळे नागरिकांना भरली धडकी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 08:53 IST2026-02-24T08:53:00+5:302026-02-24T08:53:46+5:30
America Iran Conflict: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर इराण येथील नागरिकांच्या मोबाईलवर एक अलर्ट मेसेज आला.

अमेरिका- इराण यांच्यातील युद्ध अटळ? मोबाईलवर आलेल्या 'त्या' मॅसेजमुळे नागरिकांना भरली धडकी!
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर इराण येथील नागरिकांच्या मोबाईलवर एक अलर्ट मेसेज आला. त्यामुळे इराणमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 'अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष अलर्ट मोडवर आहेत, पहा काय घडतंय?' असा मेसेज एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून आला असला तरी ट्रम्प यांच्या मागील धमक्यांच्या पार्श्वभूमीवर इराणी नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. इराण इंटरनॅशनल न्यूज एजन्सीच्या दाव्यानुसार, इराणवर संभाव्य लष्करी हल्ला होण्याचे संकेत मानले जात आहेत.
अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु विमानवाहू जहाज, यूएसएस आर. गेराल्ड फोर्ड, इस्रायलजवळील समुद्रात तैनात करण्यात आले आहे. तेहरानच्या जवळ अमेरिकन सैन्याने युद्ध सामग्री गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याची योजना आखल्याचे दिसत आहे. युद्धजन्य परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, अमेरिकेने लेबनॉनमधील आपल्या दूतावासातील अनेक कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढले आहे. ही खबरदारीची पावले मोठ्या संघर्षाची नांदी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
येत्या गुरुवारी जिनेव्हा येथे इराण आणि अमेरिका यांच्यात अणु करारावर चर्चेची पुढील फेरी पार पडणार आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, "राजनैतिक तोडगा निघू शकतो. मात्र, आम्ही कोणत्याही लष्करी दबावाला बळी पडणार नाही." दरम्यान, गुरुवारी होणारी ही चर्चा निष्फळ ठरली, तर ट्रम्प प्रशासन इराणविरोधात थेट लष्करी कारवाईचे पाऊल उचलण्याची दाट शक्यता आहे.