इस्त्रायलचा पुढचा निशाणा पाकिस्तान? 'त्या' दाव्याने इम्रान खान-शहबाज शरीफ यांची झोप उडाली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 10:31 IST2026-01-14T10:30:35+5:302026-01-14T10:31:58+5:30
इराणमध्ये खामेनी यांच्या राजवटीविरोधात सुरू असलेल्या तीव्र निदर्शनांनी केवळ इराणच नाही, तर शेजारील पाकिस्तानचीही धाकधूक वाढवली आहे.

इस्त्रायलचा पुढचा निशाणा पाकिस्तान? 'त्या' दाव्याने इम्रान खान-शहबाज शरीफ यांची झोप उडाली!
इराणमध्ये अयातुल्ला अली खामेनी यांच्या राजवटीविरोधात सुरू असलेल्या तीव्र निदर्शनांनी केवळ इराणच नाही, तर शेजारील पाकिस्तानचीही धाकधूक वाढवली आहे. इराणमधील या अस्थिरतेचा फायदा घेत अमेरिका आणि इस्त्रायल मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. मात्र, या संघर्षात इस्त्रायलचा पुढचा निशाणा पाकिस्तान असू शकतो, असा खळबळजनक दावा पाकिस्तानचे प्रसिद्ध राजकीय विश्लेषक नजम सेठी यांनी केला आहे. या दाव्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
इस्त्रायलला पाकिस्तानची अण्वस्त्रे का खुपतात?
नजम सेठी यांनी 'दुनिया न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे की, त्यांना कोणत्याही इस्लामिक देशाकडे अण्वस्त्रे असलेली आवडत नाहीत. जरी पाकिस्तानचे अण्वस्त्र कार्यक्रम प्रामुख्याने भारताला केंद्रस्थानी ठेवून आखलेले असले, तरी जागतिक स्तरावर पाकिस्तानवर सतत दबाव टाकला जात आहे. इराणमधील परिस्थिती हाताबाहेर गेल्यास इस्त्रायल आपले लक्ष पाकिस्तानच्या अण्वस्त्रांकडे वळवू शकतो, अशी भीती सेठी यांनी व्यक्त केली आहे.
पारंपारिक युद्धात भारतासमोर टिकाव लागणे अशक्य!
यावेळी नजम सेठी यांनी पाकिस्तानच्या लष्करी ताकदीची पोलखोलही केली. "पाकिस्तान पारंपारिक युद्धात भारताचा मुकाबला करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे," असे त्यांनी मान्य केले. भारताच्या वाढत्या लष्करी शक्तीमुळेच पाकिस्तानने अद्याप 'नो फर्स्ट यूज' या धोरणावर स्वाक्षरी केलेली नाही. जर भारताने पारंपारिक पद्धतीने हल्ला केला, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करण्याच्या मानसिकतेत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
जागतिक स्तरावर संशयाचे धुके
पाकिस्तान आपली अण्वस्त्र तंत्रज्ञान आखाती देशांसोबत शेअर करू शकतो, अशी भीती पाश्चिमात्य देशांना आणि इस्त्रायलला वाटत आहे. यामुळेच पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर आंतरराष्ट्रीय संघटनांचे बारीक लक्ष आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून मिळालेल्या धक्क्यानंतर पाकिस्तानी सत्ताधारी आपल्या जनतेला खोटे आश्वासन देत असले, तरी आतून मात्र ते प्रचंड दबावाखाली आहेत.
इराणमधील हिंसाचाराचा परिणाम
दुसरीकडे, इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत सुमारे २००० लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, इराण सरकारने अनेक दिवसांनंतर काही निर्बंध शिथिल करून आंतरराष्ट्रीय कॉल्सना परवानगी दिली आहे. इराणमधील ही ठिणगी शेजारील देशांमध्येही पसरण्याची शक्यता असल्याने संपूर्ण दक्षिण आशियात युद्धाचे ढग दाटले आहेत.