"इराणकडून अमेरिकेला धोका, हे धादांत खोटं; 'त्या' लोकांच्या दबावामुळे युद्ध थोपले", संचालक केंट यांचे ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 09:24 IST2026-03-18T09:19:47+5:302026-03-18T09:24:44+5:30
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर, तसेच राष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंद्राचे संचालक जोसेफ केंट यांनी राजीनामा दिल्याने खळबळ माजली आहे. केंट यांनी विनाकारण इराणसोबतचे युद्ध सुरू केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

"इराणकडून अमेरिकेला धोका, हे धादांत खोटं; 'त्या' लोकांच्या दबावामुळे युद्ध थोपले", संचालक केंट यांचे ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप
"उच्च पदस्थ इस्रायली अधिकारी आणि प्रभावशाली अमेरिकने पत्रकारांनी चुकीची माहिती पसरवली गेली. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका फर्स्ट ही मोहीम कमकुवत झाली होती. त्यानंतर इराण अमेरिकेसाठी मोठा धोका तयार करत असल्याचे सांगितले गेले. जे की धादांत खोटं आहे", असा गंभीर आरोप करत अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर, तसेच राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचे संचालक जोसेफ केंट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी झटका असल्याचे बोलले आहे.
४५ वर्षीय जोसेफ केंट हे अमेरिकेच्या विशेष दल आणि सीआयएचे एक अनुभवी अधिकारी आहेत. त्यांची पत्नी शॅनन केंट या अमेरिकेच्या नौदलात क्रिप्टोलॉजिक तंत्रज्ञ होत्या. त्यांचा २०१९ मध्ये सीरियात झालेल्या एका आत्मघाती बॉम्बस्फोटात मृत्यू झाला होता. या घटनेचाही उल्लेख केंट यांनी आपल्या पत्रात केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प भडकले; म्हणाले, त्यांनी राजीनामा देऊन चांगलं केलं
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केंट यांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना चीड व्यक्त केली. "मी त्यांचा राजीनामा वाचला आहे. मला नेहमी वाटलं की, ते एक चांगली व्यक्ती आहेत. पण, संरक्षणाच्या मुद्द्यावर ते कमकुवत, खूप कमकुवत आहेत, असे मला नेहमी वाटत आले आहे", असे ट्रम्प म्हणाले.
"मी त्यांना जास्त ओळखत नव्हतो, पण मी जेव्हा त्यांचा राजीनामा वाचला, तेव्हा मला वाटलं की, त्यांनी पदावरून जाणेच चांगले आहे. कारण त्यांनी असे म्हटले आहे की, इराणमुळे अमेरिकेला कोणताही धोका नाहीये", अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली.
जोसेफ केंट यांच्या राजीनाम्यात खळबळजनक दावे, वाचा पत्र
अध्यक्ष ट्रम्प,
खूप विचारांती मी राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राच्या संचालक पदावरून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
इराणमधील सुरू असलेल्या युद्धाला मी विवेकी विचाराने समर्थन देऊ शकत नाही. इराणने आपल्या देशाला कोणताही अचानक धोका निर्माण केला नव्हता आणि हे स्पष्ट आहे की इस्रायल आणि त्याच्या प्रभावशाली अमेरिकन लॉबीच्या दबावामुळे आपण हे युद्ध सुरू केले आहे.
मी २०१६, २०२० आणि २०२४ मध्ये आपण मांडलेल्या मूल्यांना आणि परराष्ट्र धोरणांना समर्थन देतो, जे आपण आपल्या पहिल्या कार्यकाळात अमलात आणले. जून २०२५ पर्यंत आपल्याला जे वाटत होते की, मध्यपूर्वेतील युद्धे ही एक सापळा होती, ज्यामुळे आपल्या देशातील राष्ट्रनिष्ठ लोकांचे जीव गेले आणि आपल्या राष्ट्राची संपत्ती व समृद्धी कमी झाली.
आपल्या पहिल्या कार्यकाळात आपण कोणत्याही आधुनिक राष्ट्राध्यक्षापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतले की शेवट नसलेल्या युद्धांमध्ये अडकून न पडता निर्णायक लष्करी शक्ती कशी वापरावी. आपण हे कासेम सोलैमानीला ठार करून आणि इसिसला पराभूत करून दाखवले.
या कार्यकाळाच्या सुरुवातीला, इस्रायली उच्च अधिकाऱ्यांनी आणि अमेरिकन माध्यमांतील प्रभावशाली लोकांनी एक दिशाभूल करणारी मोहीम राबवली, ज्यामुळे “अमेरिका फर्स्ट” या आपल्या भूमिकेला पूर्णपणे धक्का बसला आणि इराणविरुद्ध युद्धासाठी जनमत तयार करण्यात आले. वातावरण निर्मिती करून आपल्याला फसवले गेले आणि असे भासवले गेले की इराण अमेरिकेसाठी आता धोकादायक बनला आहे आणि आपण आता हल्ला केल्यास झटपट विजय मिळेल.
हे खोटे होते आणि इस्रायलने इराक युद्धात आपल्याला ओढण्यासाठी वापरलेल्या तंत्रासारखेच होते, ज्यामुळे आपल्या देशाला हजारो कर्तबगार स्त्री-पुरुषांचे प्राण गमवावे लागले. आपण ही चूक पुन्हा करू शकत नाही.
एक सैनिक म्हणून ज्याने ११ वेळा युद्ध लढले आहे आणि एक ‘गोल्ड स्टार’ पती म्हणून ज्याने इस्रायलने घडवलेल्या युद्धात माझी प्रिय पत्नी शॅनन गमावली, मी पुढील पिढीला अशा युद्धात पाठवण्याचे समर्थन करू शकत नाही, ज्याचा अमेरिकन जनतेला काहीही फायदा नाही किंवा अमेरिकन जिवांची मूल्य योग्य ठरवत नाही.
मी प्रार्थना करतो की इराणमध्ये आपण काय करत आहोत आणि कोणासाठी करत आहोत याचा विचार कराल. आता ठोस कृतीची वेळ आली आहे. आपण दिशा बदलून आपल्या राष्ट्रासाठी नवा मार्ग निवडू शकता, किंवा आपल्याला अधोगती आणि अराजकतेकडे जाऊ देऊ शकता. निर्णय आपल्या हातात आहे.
आपल्या प्रशासनात सेवेची संधी मिळणे आणि आपल्या महान राष्ट्राची सेवा करणे हा माझ्यासाठी सन्मान होता.