इराणचे नवे 'गेम चेंजर'! कोण आहेत सईद जलीली? ज्यांना शत्रूही घाबरतात आणि समर्थक म्हणतात 'जिंदा शहीद'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 09:24 IST2026-03-18T09:24:24+5:302026-03-18T09:24:46+5:30
इराणच्या 'सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदे'च्या प्रमुखपदी आता सईद जलीली यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

इराणचे नवे 'गेम चेंजर'! कोण आहेत सईद जलीली? ज्यांना शत्रूही घाबरतात आणि समर्थक म्हणतात 'जिंदा शहीद'!
इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी इराणने अत्यंत वेगवान हालचाली केल्या आहेत. इराणच्या 'सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदे'च्या प्रमुखपदी आता सईद जलीली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जलीली यांनी सूत्रे हाती घेताच इस्रायलविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला असून, तेल अवीवसह अनेक शहरांवर एकाच वेळी मोठे हल्ले चढवून आपल्या इराद्यांची चुणूक दाखवून दिली आहे.
कोण आहेत सईद जलीली? ज्यांना म्हणतात 'जिंदा शहीद'
१९६५ मध्ये मशहद या धार्मिक केंद्रात जन्मलेले ६० वर्षीय सईद जलीली हे इराणमधील अत्यंत कट्टर आणि प्रभावशाली नेते मानले जातात. इराण-इराक युद्धादरम्यान त्यांनी आपला उजवा पाय गमावला होता. या बलिदानामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये त्यांना 'जिंदा शहीद' या नावाने ओळखले जाते. त्यांचे वडील शिक्षक होते, तर आई अजेरी मूळची आहे. अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या जलीली यांनी जागतिक राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पाश्चात्य देशांसाठी 'कट्टर' डोकेदुखी
सईद जलीली हे केवळ लष्करी विचारवंत नाहीत, तर ते एक मुरलेले मुत्सद्दीही आहेत. २००७ ते २०१३ या काळात त्यांनी इराणचे मुख्य अणू वार्ताकार म्हणून काम पाहिले आहे. पाश्चात्य देशांसोबतच्या चर्चेदरम्यान त्यांनी कधीही लवचिक भूमिका घेतली नाही, त्यामुळे सीआयए संचालक विल्यम बर्न्स यांनी त्यांचे वर्णन "इराणी क्रांतीचा खरा अनुयायी" असे केले होते. जलीली यांनी पाश्चात्य तत्त्वज्ञानात डॉक्टरेट मिळवली असून त्यांनी विद्यापीठात अध्यापनही केले आहे.
राजकीय प्रवास आणि प्रभाव
२०१३ मध्ये जलीली यांनी इराणच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले असले तरी, इराणच्या सनातनी आणि कट्टरपंथी गटांमध्ये त्यांचा शब्द आजही अंतिम मानला जातो. लारीजानींच्या मृत्यूनंतर, जोपर्यंत नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई कायमस्वरूपी नियुक्ती करत नाहीत, तोपर्यंत जलीली यांच्याकडेच इराणच्या सुरक्षेची आणि युद्धाची संपूर्ण सूत्रे असतील.
इस्रायलविरुद्ध पुकारले 'आरपारचे युद्ध'
मंगळवारी रात्री उशिरा अली लारीजानींच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर इराणने तत्काळ जलीली यांच्या नावाची घोषणा केली. जलीली यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच इस्रायलच्या विविध शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्याचे आदेश दिले. लारीजानी यांच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ जलीली यांनी घेतली असून, आता अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षात जलीली कोणते कठोर निर्णय घेतात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.