भारताच्या सीमेजवळ युद्धाचा भडका! पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 15:58 IST2026-03-04T15:55:09+5:302026-03-04T15:58:38+5:30
श्रीलंकेच्या समुद्रकिनाऱ्यावर इराणी युद्धनौकेवर पाणबुडीचा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.

भारताच्या सीमेजवळ युद्धाचा भडका! पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी
Submarine Attack on Iranian Ship: हिंदी महासागरात श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर बुधवारी एका इराणीयुद्धनौकेवर भीषण पाणबुडी हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात इराणची आयआरआयएस डेना ही युद्धनौका समुद्रतळाला गेली असून, त्यावरील किमान १०१ कर्मचारी बेपत्ता आहेत, तर ७८ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती श्रीलंकेच्या नौदलाने आणि संरक्षण मंत्रालयाने दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, १८० कर्मचारी असलेल्या या इराणी फ्रिगेटवरून पहाटेच्या सुमारास आपत्कालीन मेसेज पाठवण्यात आला होता. ही नौका श्रीलंकेच्या किनाऱ्यापासून साधारण २५ मैल दक्षिणेला असताना अचानक मोठा स्फोट होऊन बुडू लागली. संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट एका अज्ञात पाणबुडीने केलेल्या हल्ल्यामुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
मोठी बचाव मोहीम सुरू
श्रीलंकेच्या नौदलाने तात्काळ प्रतिसाद देत दोन युद्धनौका आणि एका विमानासह मोठी बचाव मोहीम राबवली. परराष्ट्र मंत्री विजिथा हेरथ यांनी संसदेत माहिती दिली की, आतापर्यंत ३० ते ३२ खलाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारांसाठी गाले इथल्या मुख्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेपत्ता १०१ जणांचा शोध घेण्यासाठी नौदल आणि हवाई दलाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र बराच वेळ झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हल्ल्यामागे कोणाचा हात? राजकीय वर्तुळात चर्चा
हा हल्ला नेमका कोणी केला, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, श्रीलंकेच्या संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी हा इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षाचा भाग तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला आहे. सरकारने यावर अद्याप कोणतेही थेट भाष्य केलेले नाही, पण आम्ही आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यानुसार मदतीचे कर्तव्य बजावत आहोत, असे नौदलाचे प्रवक्ते बुद्धिका संपथ यांनी स्पष्ट केले.
सुरक्षेचा कडक बंदोबस्त आणि गोपनीयता
जखमी इराणी खलाशांवर उपचार सुरू असलेल्या गाले रुग्णालयाबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या देशाच्या लष्करी कारवाईशी संबंधित प्रकरण असल्याने श्रीलंकेचे नौदल किंवा हवाई दल या बचाव कार्याचे कोणतेही फुटेज जाहीर करणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. "आम्ही शोध मोहीम सुरू ठेवली आहे, परंतु उर्वरित कर्मचाऱ्यांचे काय झाले याची अद्याप कोणतीही माहिती नाही. परिस्थिती गंभीर आहे, अशी माहिती श्रीलंकेच्या नौदल अधिकाऱ्यांनी दिली.