इराण पेटला...! सर्वोच्च नेते खामेनेईंविरुद्ध तरुणाईचे रस्त्यावर उतरून आंदोलन; देशाच्या अर्थव्यवस्थेला घरघर, निदर्शनात सात जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 10:55 IST2026-01-03T10:51:32+5:302026-01-03T10:55:39+5:30
निदर्शकांवरील गोळीबार थांबवा : ट्रम्प

इराण पेटला...! सर्वोच्च नेते खामेनेईंविरुद्ध तरुणाईचे रस्त्यावर उतरून आंदोलन; देशाच्या अर्थव्यवस्थेला घरघर, निदर्शनात सात जणांचा मृत्यू
दुबई (संयुक्त अरब अमिरात) : इराणच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेच्या निषेधार्थ देशभरात असंतोष पसरला असून, देशाचे हुकूमशाह अयातुल्ला खामेनेई यांच्याविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. विशेषत: ‘जेन-झी’ अर्थात तरुणाईची जागोजागी सरकारविरोधात उग्र निदर्शने सुरू असून, सुरक्षा दले व निदर्शकांत झालेल्या संघर्षात सात जणांचा मृत्यू झाला आहे.
गरिबी, बेरोजगारी व महागाईच्या निषेधार्थ हा असंतोष पसरला आहे. हुकूमशाही विरोधात तरुणाई रस्त्यावर उतरल्यामुळे तेथील राजसत्तेलाही चांगलाच हादरा बसला आहे. दरम्यान, राजधानी तेहरानमध्ये निदर्शने मंदावली असली, तरी इतरत्र निदर्शक प्रचंड आक्रमक झाले आहेत.
ग्रामीण भागांतही तणाव
इराणच्या शहरांतून आता सरकारविरोधी निदर्शनांचे लोण ग्रामीण भागांत पसरले असून, गुरुवारी तर स्थिती अत्यंत गंभीर झाली होती. ‘हुकूमशाह मुर्दाबाद’च्या घोषणांनी शहरांसह ग्रामीण भागांतही तरुणाईने आंदोलन पुकारले आहे.
२०२२ नंतर प्रथमच -
या देशात २०२२ नंतर रस्त्यावर उतरून सरकारविरुद्धचा संताप व्यक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तीन वर्षांतील ती सर्वात मोठी निदर्शने ठरली आहेत. या पूर्वी २२ वर्षीय महसा अमिनी हिच्या पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूनंतर २०२२ मध्ये देशभरात अशीच उग्र निदर्शने झाली होती.
ट्रम्प यांची जाहीर धमकी
इराणमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण सरकारला जाहीर धमकी दिली आहे. शांततेच्या मार्गाने निदर्शने करणाऱ्या तरुणांवर-नागरिकांवर असाच गोळीबार सुरू राहिला तर अमेरिका शांत बसणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तरुणांचे हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करू नका, असे ट्रम्प यांनी इराणला बजावले आहे.
रस्त्यांवर पेटत्या वस्तू, गोळीबाराचे आवाज -
लोरेस्तान प्रांतातील अजना शहरात तरुणाईचे हे आंदोलन अधिक पेटले असून, या शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये रस्त्यांवर जळत्या वस्तू आणि गोळीबाराचे आवाज येत असल्याचे दिसत आहे.
अशी आहे स्थिती -
माध्यमांतील वृत्तानुसार इराणच्या सुमारे २१ राज्यांत हा असंतोष पसरला आहे. देशातील महागाई व आर्थिक संकट हे या असंतोषामागचे मुख्य कारण आहे. इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत वकिलातीकडे साकडे.