आता तेल नव्हे तर अमेरिकन टेक साम्राज्यावर हल्ल्याचं संकट; इराणची मोठी धमकी, 'या' परिसरापासून १ किमी दूर राहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:36 IST2026-03-11T17:33:30+5:302026-03-11T17:36:52+5:30
या कंपन्यांची क्लाउड सेवा आणि डेटा पायाभूत सुविधा लष्करी तंत्रज्ञानासाठी वापरला जात असल्याचा आरोप आहे.

Generated Image by AI
तेहरान - पश्चिम आशियातील संघर्षाने आता घातक वळण घेतलं आहे. इराणने पहिल्यांदाच अमेरिकन टेक कंपन्यांना थेट धमकी दिली आहे. जर प्रादेशिक युद्ध आणखी पसरले तर गुगल, अॅमेझॉन, माइक्रोसॉफ्ट आणि एनविडियासारख्या अमेरिकन कंपन्यांची कार्यालयांवर हल्ला करू शकतो. या कंपन्या क्लाऊड आणि तंत्रज्ञानाचा वापर सैन्य कारवाईसाठी करत असल्याचा इराणचा आरोप आहे. या इशाऱ्यामुळे हे युद्ध लष्करी संघर्षापासून तंत्रज्ञान आणि आर्थिक पायाभूत सुविधांच्या लढाईपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर त्याचा परिणाम संपूर्ण जागतिक तंत्रज्ञान आणि आर्थिक व्यवस्थेवर होऊ शकतो अशी तज्ज्ञांनी भीती वर्तवली आहे.
टेक कंपन्यांना इराणचा थेट इशारा
इराणी माध्यमाच्या रिपोर्टनुसार, इराणने अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांविरोधात मोठी कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकन टेक कंपन्यांचे कार्यालय आणि इतर पायाभूत गोष्टी इराणच्या संभाव्य हल्ल्याच्या टार्गेटवर आहेत. या कंपन्यांमधील तंत्रज्ञानाचा वापर कथितपणे सैन्य कारवाईसाठी केला जात असल्याचा आरोप इराणने केला. त्यामुळे इराणने या ठिकाणांना लक्ष्य करण्याची योजना आखली आहे.
इराणच्या टार्गेटवर कोण?
गुगल
माइक्रोसॉफ्ट
अॅमेझॉन
एनविडिया
आयबीएम
ऑरेकल
पॅलेंटिर टेक्नोलॉजीज
या कंपन्यांची क्लाउड सेवा आणि डेटा पायाभूत सुविधा लष्करी तंत्रज्ञानासाठी वापरला जात असल्याचा आरोप आहे. म्हणूनच इराणने त्यांच्याशी संबंधित सुविधांना संभाव्य लक्ष्य म्हणून सांगितले आहे. या कंपन्यांची कार्यालये इस्रायलच्या अनेक शहरात आहेत. त्याशिवाय आखाती देशांमध्येही कंपन्यांची डेटा सेंटर, टेक सुविधा उपलब्ध आहेत. जर युद्ध वाढले तर या ठिकाणांवरही हल्ला होऊ शकतो असा दावा इराणने केला आहे.
आर्थिक केंद्र आणि बँकाही निशाण्यावर
इराणने केवळ टेक कंपन्याच नाही तर आर्थिक संस्थांनाही इशारा दिला आहे. अमेरिका, इस्रायलमधील आर्थिक केंद्र आणि बँकाही टार्गेट केल्या जाऊ शकतात असं इराणचे खतम अल अंबिया मुख्यालयाचे प्रवक्ते यांनी म्हटलं आहे. इराणने बँक, आर्थिक केंद्राजवळील नागरिकांना आवाहन करत सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे. लोकांनी बँकेच्या १ किमी परिसरात येऊ नका असं इराणने सांगितले.