इस्राइलच्या हल्ल्यात लारिजानींसोबत मुलाचाही मृत्यू, दोघांच्याही शवपेटीचे फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:49 IST2026-03-18T13:48:36+5:302026-03-18T13:49:25+5:30
Iran War News: अमेरिका आणि इस्राइलकडून इराणविरोधात सुरू करण्यात आलेल्या युद्धामध्ये इराणला मोठा धक्का बसला असून, इस्राइलने काल केलेल्या भेदक हल्ल्यांमध्ये इराणमधील बडे नेते अली लारिजानी हे मारले गेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा मोर्तजा लारिजानी याचाही मृत्यू झाला आहे.

इस्राइलच्या हल्ल्यात लारिजानींसोबत मुलाचाही मृत्यू, दोघांच्याही शवपेटीचे फोटो आले समोर
अमेरिका आणि इस्राइलकडून इराणविरोधात सुरू करण्यात आलेल्या युद्धामध्येइराणला मोठा धक्का बसला असून, इस्राइलने काल केलेल्या भेदक हल्ल्यांमध्ये इराणमधील बडे नेते अली लारिजानी हे मारले गेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा मोर्तजा लारिजानी याचाही मृत्यू झाला आहे. सुरुवातीला इराणने अली लारिजानी यांचा मृत्यू झाल्याचे दावे फेटाळून लावले होते. मात्र आता तेहरानमधील शहीद स्मारकात अली लारिजानी आणि त्यांचा मुलगा मोर्तजा लारिजानी यांचे मृतदेह ठेवलेल्या शवपेट्यांचे फोटो समोर आले आहेत. अली लारिजानी हे इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव होते.
मंगळवारी अली लारिजानी हे परदिस येथे त्यांच्या मुलीच्या घरी होते. त्याचवेळी इस्राइलने लारिजानी यांना लक्ष्य करत हा भीषण हल्ला केला होता. अली लारिजानी यांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या या हल्ल्यात अली लारिजानी यांच्यासह त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला. आता लारिजानी पिता-पुत्रांचे मृतदेह ठेवलेल्या शवपेट्या तेहरानमधील शहीद स्मारकात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच लारिजानी यांच्या मृतदेहाच्या बाजूला त्यांच्या मुलाचा मृतदेह ठेवल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.
लारिजानी यांच्या मृत्यूबाबत इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने सांगितले की, लारिजानी यांचा मृत्यू तेहरानच्या उत्तर-पूर्वेस असलेल्या परदिस येथे सकाळच्या सुमारास झाला. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा मौर्तझा लारिजानी, त्यांचे संरक्षणविषयक डेप्युटी अलिरेजा बायात आणि सुरक्षा रक्षकही उपस्थित होते. सुरक्षा परिषदेने अली लारिजानी यांचा उल्लेख इस्लामी प्रजासत्ताकाचे आजीवन सेवक असा केला. सकाळच्या प्रहरी अली लारिजानी हे त्यांचा मुलगा मोर्तझा, अलिरेजा बायात आणि इतर सुरक्षा रक्षकांसह मृत्युमुखी पडले.