'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 12:56 IST2026-04-03T12:54:36+5:302026-04-03T12:56:15+5:30
Iran War Update: इराण-अमेरिका युद्ध अपडेट: कुवेतच्या मीना अल-अहमदी रिफायनरीवर इराणचा मोठा हल्ला. UAE च्या Stargate AI डेटा सेंटरलाही दिली धमकी. माजी मंत्री जरीफ यांनी दिला शांततेचा सल्ला. वाचा सविस्तर.

'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
मध्य-पूर्वेतील युद्धाने आता भयानक वळण घेतले आहे. इराणने कुवेतच्या सर्वात महत्त्वाच्या मीना अल-अहमदी रिफायनरीवर ड्रोन हल्ला केला असून, अनेक युनिट्सना भीषण आग लागली आहे. दुसरीकडे, इराणने संयुक्त अरब अमिरातीमधील जगातील सर्वात मोठ्या 'Stargate AI' डेटा सेंटरला लक्ष्य करण्याची धमकी देणारा व्हिडिओ जारी केल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अशातच इराणने आता विजयाची घोषणा करावी, असा सल्ला इराणच्या माजी संरक्षण मंत्र्यांनी दिला आहे.
आज पहाटे इराणच्या ड्रोन्सनी कुवेतच्या मीना अल-अहमदी रिफायनरीला लक्ष्य केले. ही रिफायनरी कुवेतच्या ऊर्जा क्षेत्राचा कणा मानली जाते. या हल्ल्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून आखाती देशांमधील सुरक्षा व्यवस्था हाय-अलर्टवर ठेवण्यात आली आहे.इराणने केवळ लष्करीच नव्हे तर 'डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर'लाही लक्ष्य करण्याचे संकेत दिले आहेत. UAE मध्ये असलेल्या १GW क्षमतेच्या 'स्टारगेट एआय' डेटा सेंटरवर हल्ला करण्याची धमकी इराणने दिली आहे. जर हा हल्ला झाला, तर जागतिक तंत्रज्ञान क्षेत्राचे मोठे नुकसान होऊ शकते.
माजी परराष्ट्र मंत्र्यांचा 'विजयाचा' सल्ला
इराणचे माजी परराष्ट्र मंत्री मोहम्मद जवाद जरीफ यांनी 'फॉरेन अफेयर्स'मधील एका लेखात इराणला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. "इराणने आता स्वतःचा विजय जाहीर करावा आणि कराराद्वारे हे युद्ध संपवावे," असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबतचा तणाव कमी करण्यासाठी त्यांनी एक 'ब्लूप्रिंट' देखील सादर केली आहे, जी इराणच्या हिताची असल्याचे त्यांनी नमूद केले.
ट्रम्प यांची धमकी आणि इराणचे 'ब्लॅकआऊट'
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे वीज प्रकल्प उडवण्याची धमकी दिल्यानंतर तेहरान आणि करज परिसरात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. इराणने याला 'युद्ध गुन्हा' म्हटले असून सुमारे ९ कोटी जनतेला याचा फटका बसत आहे. ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणने आपली आक्रमक भूमिका सोडलेली नाही.