Iran War: "दररोज कोलांटउड्या मारणं बंद करा"; धरसोड भूमिकेवरून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 20:02 IST2026-04-02T19:57:52+5:302026-04-02T20:02:10+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराण युद्धाबद्दल दररोज मांडत असलेल्या भूमिकांवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी तिखट शब्दात अमेरिकेच्या अध्यक्षांना सुनावले.

Iran War: "दररोज कोलांटउड्या मारणं बंद करा"; धरसोड भूमिकेवरून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
मागील काही दिवसांपासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत असलेली विधाने सगळ्यांनाच बुचकळ्यात पाडत आहेत. ट्रम्प यांच्या सततच्या कोलांटउड्यावरून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांना आपला संताप आवरता आला नाही. 'दररोज आपल्याच विधानांनाविरोधात बोलणं चालू शकत नाही', असे मॅक्रॉन ट्रम्प यांना म्हणाले.
पाच दिवसांसाठी हल्ले थांबवण्याची घोषणा केल्यापासून डोनाल्ड ट्रम्प दररोज वेगवेगळ्या भूमिका मांडू लागले आहेत. आधी इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्यावर सडकून टीका करणारे ट्रम्प आता त्यांचे कौतुक करत आहेत. युद्ध थांबवणार असे म्हणत आहेत आणि मध्येच इराणला बेचिराख करू असेही म्हणत आहेत.
मॅक्रॉन ट्रम्प यांच्यावर संतापले
इराण युद्धाबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांच्या विसंगत आणि वारंवार बदलणाऱ्या भूमिकांवर बोट ठेवत मॅक्रॉन म्हणाले की, "तुम्ही दररोज स्वतःच्याच केलेल्या विधानांचा विरोध करू शकत नाही."
मॅक्रॉन हे दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मॅक्रॉन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह केले. त्याचबरोबर हॉर्मुझ सामुद्रधुनी लष्करी बळाचा वापर करून पुन्हा सुरू करण्याचा अमेरिकेचा विचार हा वास्तवाला धरून नसल्याचे सांगत त्यांनी तो फेटाळून लावला.
तुम्ही रोज बोलूच नका -मॅक्रॉन
इमॅन्यूएल मॅक्रॉन म्हणाले, "तुम्हाला जर खरंच गांभीर्याने काम करायचे असेल, तर तुम्ही आदल्या दिवशी जे बोललात, त्याच्या अगदी विसंगत दुसऱ्या दिवशी बोलू नका. कदाचित तुम्ही रोज न बोललेलेच बरे होईल", अशा शब्दात त्यांनी सुनावले.
"अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये लष्करी हस्तक्षेप करणे धोक्याचे ठरेल, कारण त्यामुळे तेथील व्यापारी जहाजे इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स आणि मिसाईल हल्ल्यांच्या टप्प्यात येतील", असा सावधगिरीचा इशाराही मॅक्रॉन यांनी ट्रम्प यांना दिला.
मॅक्रॉन पुढे बोलताना म्हणाले की, "या संघर्षावर लष्करी कारवाई हा उपाय नाही, 'शस्त्रसंधी करणे आणि इराणसोबत पुन्हा चर्चा सुरू करणे' हाच एकमेव मार्ग त्यावर आहे."
इराणच्या आयआरजीसीनेही दिला इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बेचिराख करण्याची धमकी दिल्यानंतर इराणच्या आयआरजीने अमेरिकेला धडा शिकवण्याची भूमिका घेतली आहे. अमेरिकेची जगात जोपर्यंत नाचक्की होत नाही, जोपर्यंत शरण येत नाही, तोपर्यंत युद्ध सुरूच ठेवणार असल्याचे इराणने म्हटले आहे.