मध्यस्थीच्या चर्चांदरम्यान, इराणने पाकिस्तानी जहाजाला होर्मुझमध्ये रोखले, परवानगी नाही म्हणत हुसकावून लावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 14:20 IST2026-03-25T14:20:03+5:302026-03-25T14:20:28+5:30
Iran War: इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)ने पाकिस्तानच्या कराची येथे जात असलेल्या एका जहाजाला होर्मुझची सामुद्रधुनी पार करण्यापासून रोखल्याची माहिती समोर येत आहे.

मध्यस्थीच्या चर्चांदरम्यान, इराणने पाकिस्तानी जहाजाला होर्मुझमध्ये रोखले, परवानगी नाही म्हणत हुसकावून लावले
अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात पुकारलेलं युद्ध हे आज २६ व्या दिवसात पोहोचले आहे. याचदरम्यान, या संघर्षामध्ये पाकिस्तान हा दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी करत असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय जगतात सुरू होती. मात्र आता इराणनेपाकिस्तानकडून होत असलेल्या मध्यस्थीच्या प्रयत्नांना केराची टोपली दाखवल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)ने पाकिस्तानच्या कराची येथे जात असलेल्या एका जहाजाला होर्मुझची सामुद्रधुनी पार करण्यापासून रोखले.
आयआरजीसीचे नौदल कमांडर अलिरेझा तंगसिरी यांनी ‘सेलेन नावाच्या या जहाजाकडे होर्मुझची सामुद्रधुनी पार करण्याची परवानगी नव्हती. या मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक जहाजाला आधी इराणी अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागेल’, असे स्पष्टपणे सांगितले.
एकीकडे अमेरिका, इस्राईल यांनी इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धामध्ये पाकिस्तान मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असतानाच हे प्रकरण उघडकीस आलं आहे. यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी काल इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियन यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता.
पाकिस्तानच्या जहाजाला इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पार करण्याची परवानगी नाकारली असताना दुसरीकडे याच भागातून भारताची पाच जहाजं आली आहे. त्यामध्ये जग वसंत, पाईन गॅस , शिवालिक, नंदादेवी आणि जग लाडकी यांचा समावेश आहे.