इराणमध्ये पेटला जनक्षोभ! आंदोलकांवर लष्करी कारवाई, ३५ जणांचा मृत्यू तर १२०० हून अधिक जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 07:45 IST2026-01-06T07:45:27+5:302026-01-06T07:45:39+5:30
Iran Protests: इराणच्या चलनाचे (रियाल) मूल्य ऐतिहासिक निचांकी पातळीवर घसरल्याने तेथील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

इराणमध्ये पेटला जनक्षोभ! आंदोलकांवर लष्करी कारवाई, ३५ जणांचा मृत्यू तर १२०० हून अधिक जण अटकेत
तेहरान: इराणमध्ये वाढती महागाई, कोलमडलेली अर्थव्यवस्था आणि इस्लामिक राजवटीच्या विरोधात सुरू झालेल्या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या या निदर्शनांमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत किमान ३५ आंदोलकांचा मृत्यू झाला असून १२०० पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये महिला आणि तरुणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
इराणच्या चलनाचे (रियाल) मूल्य ऐतिहासिक निचांकी पातळीवर घसरल्याने तेथील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तेहरानच्या बाजारपेठेतून आर्थिक प्रश्नांवर सुरू झालेले हे आंदोलन आता राजकीय आंदोलनात रूपांतरित झाले आहे. आंदोलक आता थेट सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या राजीनाम्याची आणि इस्लामिक सत्ता संपवण्याची मागणी करत आहेत. २०२२ मधील महसा अमिनी प्रकरणांनंतरचे हे सर्वात मोठे आणि व्यापक आंदोलन असल्याचे मानले जात आहे.
सुरक्षा दलांकडून अमानुष छळ
मानवाधिकार संघटनांच्या अहवालानुसार, इराणच्या ३१ पैकी २७ प्रांतांमध्ये ही आंदोलने पसरली आहेत. अनेक ठिकाणी सुरक्षा दलांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी थेट गोळीबार आणि जड शस्त्रास्त्रांचा वापर केला आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी आंदोलकांना 'परकीय एजंट' आणि 'दंगलखोर' संबोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. इराण सरकारने हे आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर सुरू केला आहे. इंटरनेटवर निर्बंध लादण्यात आले असून अनेक शहरांमध्ये लष्करी तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तरुण आणि महिलांची संख्या मोठी आहे. मानवाधिकार संघटनांनी इराणमधील या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली असून, अटकेत असलेल्या लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.