NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 19:03 IST2025-06-16T19:02:14+5:302025-06-16T19:03:03+5:30
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, एनपीटीमधून बाहेर पडण्यासंदर्भात इराणी संसदेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. तर, हा प्रस्ताव कायदेशीर प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे, असे एका खासदाराने म्हटले आहे.

NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. यातच, इराणी संसद अण्वस्त्र प्रसारबंदी करार अर्थात 'एनपीटी'मधून बाहेर पडण्यासाठी एक विधेयक तयार करत आहे, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी (१६ जून २०२५) सांगिलते. मात्र, आम्ही अण्वस्त्रे बनवण्याच्या बाजूने नाही, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बाघई यांनी स्पष्ट केले आहे.
सुरुवातीच्या टप्प्यावर आहे कायदेशीर प्रक्रिया -
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, एनपीटीमधून बाहेर पडण्यासंदर्भात इराणी संसदेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. तर, हा प्रस्ताव कायदेशीर प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे, असे एका खासदाराने म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात, तेहरान अणुबॉम्ब बनवण्याच्या मार्गावर आहे, असे इराणने म्हटले होते. याशिवाय, आपला अणुकार्यक्रम शांततापूर्ण आहे, असेही इराण नेहमीच म्हणत असतो. दरम्यान, तेहरान त्यांच्या एनपीटी दायित्वांचे उल्लंघन करत आहे, असे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (आयएईए) गेल्या आठवड्यातच, म्हटले आहे.
इस्रायलचा इराणला इशारा -
खरेतर, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे या भागात युद्धाची भीती वाढली असतानाच हे पाऊल उचलण्यात आले आहे. दरम्यान, इस्रायलने इराणी शस्त्रास्त्र आस्थापनांजवळ राहणाऱ्या लोकांना त्यांचे तळ रिकामे करण्याचा इशारा दिला आहे.
काय आहे NPT? -
अण्वस्त्र प्रसारबंदी करार (एनपीटी) हा अण्वस्त्रे आणि संबंधित तंत्रज्ञानाचा प्रसार रोखण्यासाठी आणि अणु उर्जेच्या शांततापूर्ण वापरात सहकार्याला प्रोत्साहन देण्यासारखे उद्दीष्ट साध्य करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय करार आहे.