इराणचा अमेरिकेला मोठा इशारा! ॲपल, मायक्रोसॉफ्टसह १८ टेक कंपन्यांवर हल्ल्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 21:46 IST2026-03-31T21:35:34+5:302026-03-31T21:46:06+5:30
इराणी भूभागावर झालेल्या हल्ल्यांचा बदला म्हणून ही कारवाई केली जाणार असल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे.

इराणचा अमेरिकेला मोठा इशारा! ॲपल, मायक्रोसॉफ्टसह १८ टेक कंपन्यांवर हल्ल्याची धमकी
मध्य पूर्वेतील तणाव आता एका नव्या वळणावर आला आहे. इराणच्या 'रिव्होल्युशनरी गार्ड्स'ने १ एप्रिलपासून अमेरिकेतील प्रमुख तंत्रज्ञान आणि औद्योगिक कंपन्यांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. इराणी भूभागावर झालेल्या हल्ल्यांचा बदला म्हणून ही कारवाई केली जाणार असल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे.
या कंपन्या आहेत इराणच्या रडारवर
इराणने एकूण १८ कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्ट (Microsoft), गुगल (Google), ॲपल (Apple), इंटेल (Intel), आयबीएम (IBM), टेस्ला (Tesla), बोईंग (Boeing). या कंपन्यांचा समावेश आहे.
इराणच्या निवेदनानुसार, इराणमध्ये होणाऱ्या प्रत्येक दहशतवादी कृत्याचा बदला म्हणून या कंपन्यांच्या प्रादेशिक विभागांना उद्ध्वस्त केले जाईल. तेहरानच्या वेळेनुसार बुधवारी, १ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून हे लक्ष्य निर्धारित केले जातील.
IRGC ने 'तस्नीम' वृत्तसंस्थेमार्फत स्पष्ट केले की, दहशतवादी लक्ष्यांची रचना आणि त्यांचा मागोवा घेण्यासाठी अमेरिकन आयसीटी आणि एआय कंपन्या हे मुख्य घटक आहेत. त्यामुळे आतापासून या संस्था आमची कायदेशीर लक्ष्ये असतील.
कर्मचाऱ्यांना इशारा
इराणने या संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी तात्काळ कामाची ठिकाणे सोडण्याचा इशाराही दिला आहे.
युद्धभूमीवर अमेरिकेची 'AI' शक्ती
अमेरिकेने आपल्या लष्करी मोहिमांमध्ये माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा प्रभावी वापर केला आहे. हे तंत्रज्ञान फक्त स्वतंत्रपणे काम करत नाही, तर ते एका महाकाय 'इंटेलिजन्स नेटवर्क'चा भाग आहे.
माहितीचे संकलन
या प्रणालीचा कणा म्हणजे 'डेटा'. अमेरिकन यंत्रणा विविध माध्यमांतून अफाट माहिती गोळा करत आहे.
सॅटेलाइट इमेजरी
अवकाशातील उपग्रहांद्वारे जमिनीवरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे.
टेहळणी ड्रोन्स
मानवरहित विमानांद्वारे शत्रूच्या भागात शिरून थेट चित्रीकरण करणे.
सिग्नल्स इंटेलिजन्स
शत्रूचे फोन कॉल्स, रेडिओ संदेश आणि इंटरनेटवरील संवाद 'इंटरसेप्ट' करणे.
AI द्वारे माहितीचे विश्लेषण
गोळा झालेली माहिती इतकी प्रचंड असते की ती माणसांना वेळेत तपासणे शक्य नसते. येथे AI महत्त्वाची भूमिका बजावते. हजारो फोटोंमधून संशयास्पद हालचाली किंवा बदलांचे पॅटर्न ओळखणे.
मानवी विश्लेषकांपेक्षा हजारो पटीने वेगाने माहितीवर प्रक्रिया करून लष्करी नियोजनकर्त्यांना सद्यस्थितीची स्पष्ट फोटो देणे.
अचूक लक्ष्यांचा शोध
या तंत्रज्ञानामुळे अमेरिकेला आपले लक्ष्य अधिक अचूकपणे निवडता येते. मग ते शस्त्रास्त्रांचे साठे असोत, कमांड सेंटर्स असोत किंवा फिरती लष्करी वाहने. AI च्या मदतीने त्यांचा अचूक मागोवा घेतला जातो.