इराणला बायपास करत UAE-ओमान बनवू शकतो नवीन होर्मुझ स्ट्रेट?; तेल व्यापाराचं गणितच बदलून जाईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 16:01 IST2026-03-10T16:00:57+5:302026-03-10T16:01:17+5:30
होर्मुझची सामुद्रधुनी त्याच्या सर्वात अरुंद बिंदूवर फक्त ३९ किलोमीटर रुंद आहे. इराण आणि ओमानमधील हा सर्वात अरुंद भाग आहे.

इराणला बायपास करत UAE-ओमान बनवू शकतो नवीन होर्मुझ स्ट्रेट?; तेल व्यापाराचं गणितच बदलून जाईल
अमेरिका इस्रायलविरोधातइराण युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याठिकाणच्या युद्ध परिस्थितीमुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील सागरी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक देशांवर इंधन संकट ओढावले आहे. पर्शियन आखात आणि अरबी समुद्र यांना जोडणारा स्ट्रेट ऑफ होर्मुझ सामुद्रधुनी ही आशियातील अनेक देशांसाठी रणनीती आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा जलमार्ग आहे. जगातील मोठ्या प्रमाणात तेल वाहतुकीचा हिस्सा याच मार्गाने जातो. या तेलाचे रिफाइनिंग होते आणि ते तेल कार, दुचाकी पेट्रोल डिझेल आणि इतर गोष्टीसाठी वापरले जाते.
होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग मानला जातो. जेव्हाही या भागात इराण आणि पश्चिमी देशांमधील तणाव वाढतो तेव्हा UAE आणि ओमान मिळून असा कुठला नवीन मार्ग का बनवत नाही जो होर्मुझला बायपास करेल असा प्रश्न विचारला जातो. तुम्ही जर स्ट्रेट ऑफ होर्मुझचा नकाशा पाहिला तर हा मार्ग पर्शियन खाडी ओमानच्या खाडीला जोडला जातो. हा अत्यंत अरुंद जलमार्ग सध्या युद्धामुळे ठप्प पडला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी पश्चिमेला युएई आणि पूर्वेला ओमानने वेढलेली आहे. होर्मुझची सामुद्रधुनीवरील भाग ओमानकडे आहे. या दोन्ही टोकांमध्ये तेलाचे टँकर सहज जाऊ शकतील इतका रुंद कालवा का बांधला जाऊ शकत नाही असं सामान्य माणसाला प्रश्न पडेल.
स्ट्रेट ऑफ होर्मुज - ११ किमीमध्ये पेच
होर्मुझची सामुद्रधुनी त्याच्या सर्वात अरुंद बिंदूवर फक्त ३९ किलोमीटर रुंद आहे. इराण आणि ओमानमधील हा सर्वात अरुंद भाग आहे. प्रत्यक्ष शिपिंग मार्गासाठी वाहतूक पृथक्करण योजना (TSS) आहे. या योजनेअंतर्गत येणाऱ्या जहाजांना २ मैल रुंद चॅनेलची आवश्यकता असते तर बाहेर जाणाऱ्या जहाजांना २ मैल रुंद चॅनेलची आवश्यकता असते, ज्यामध्ये दोघांमध्ये २ मैल अंतर असते. याचा अर्थ एकूण वापरण्यायोग्य चॅनेल फक्त ६ मैल (अंदाजे ११ किलोमीटर) आहे. मोठे टँकर उर्वरित रुंदीवर चालत नाहीत कारण खोली उथळ आहे. म्हणून मोठ्या जहाजांना पृष्ठभागावर टक्कर होण्याचा धोका जास्त असतो. मग युएई आणि ओमान जमिनीच्या या तीक्ष्ण पट्ट्यामधून का कापत नाहीत आणि नवीन कालवा का बांधत नाहीत? असा प्रश्न पडतो. प्रथम दर्शनी ही कल्पना सोपी वाटते, परंतु प्रत्यक्षात, भूगोल, तंत्रज्ञान आणि राजकारण लक्षात घेता हा प्रकल्प अत्यंत गुंतागुंतीचा आहे.
UAE आणि ओमान यांच्यात जी जमीन आहे तिथे उंच आणि कडक डोंगराळ भाग आहे. या परिसरात समुद्राला समुद्राशी जोडणे म्हणजे शेकडो किलोमीटर लांब खोदकाम आणि डोंगर कापावे लागतील. इंजिनिअरींगच्या दृष्टीने हा खूप कठीण आणि खर्चिक प्रकल्प आहे. जर हे कापून कालवा बनवला तर जहाजांना स्ट्रेट ऑफ होर्मुझ बायपास करून जाता येईल. परंतु हे सोपे नाही. इथली जमीन वाळूची नाही तर दगडांची आहे. याठिकाणचे डोंगर ९ ते १० कोटी वर्ष जुने मानले जातात. कालवा बनवण्यासाठी ६० मैल डोंगर कापावे लागतील. ज्यासाठी २०० अब्ज डॉलरहून अधिक खर्च येईल. जर नवीन जलमार्ग तयार झाला ज्यातून खाडीतून तेल जहाज अरबी समुद्रापर्यंत पोहचली तर त्यामुळे प्रादेशिक संतुलन बिघडू शकते. या प्रकल्पावर ओमान, UAE ची संमती हवीत शिवाय इराणही या प्रकल्पाला विरोध करू शकते.