इस्रायलचा तेहरानच्या लष्करी मुख्यालयावर हल्ला; 'आता युद्धाशिवाय पर्याय नाही', राष्ट्राध्यक्ष मसूद पजशकियान यांचा आखाती देशांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 03:18 IST2026-03-05T03:18:39+5:302026-03-05T03:18:55+5:30
Iran - Israel War updates: इस्रायली लष्कराने तेहरानमधील IRGC च्या मुख्य मुख्यालयावर मोठा हवाई हल्ला केला आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पजशकियान यांनी आता युद्धाशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले आहे. वाचा सविस्तर वृत्त.

इस्रायलचा तेहरानच्या लष्करी मुख्यालयावर हल्ला; 'आता युद्धाशिवाय पर्याय नाही', राष्ट्राध्यक्ष मसूद पजशकियान यांचा आखाती देशांना इशारा
तेहरान/तेल अवीव: मध्य-पूर्वेतील युद्धाने आता सर्वात भीषण वळण घेतले आहे. इस्रायली संरक्षण दलाने बुधवारी इराणची राजधानी तेहरानमधील सर्वात महत्त्वाच्या आणि अतिसुरक्षित अशा 'सेंट्रल कमांड' लष्करी संकुलावर मोठा हवाई हल्ला केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यानंतर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पजशकियान यांनी आक्रमक पवित्रा घेत, "आता आमच्याकडे इस्रायलला चोख प्रत्युत्तर देण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही," असे स्पष्ट केले आहे.
इस्रायली लष्कराच्या दाव्यानुसार, ज्या संकुलावर हल्ला करण्यात आला तिथे इराणच्या अनेक गुप्तचर यंत्रणा आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे मुख्य कार्यालय होते. इराणचे नेतृत्व लष्करी मोहिमांचे नियोजन याच केंद्रातून करत असे, जे आता इस्रायलने लक्ष्य केले आहे.
इराणी राष्ट्राध्यक्षांचा खुलासा
राष्ट्राध्यक्ष पजशकियान यांनी सोशल मीडियाद्वारे आखाती देशांना संबोधित करताना सांगितले की, "इराणने कूटनीतिक मार्गांनी युद्ध टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मात्र, अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या थेट हल्ल्यांमुळे आता प्रत्युत्तर देणे ही आमची मजबुरी आहे." इराणने स्पष्ट केले आहे की, ते इतर देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर करतात आणि मध्य-पूर्वेची सुरक्षा ही केवळ सामूहिक प्रयत्नांनीच शक्य आहे. कतारच्या पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेनंतर पजशकियान यांनी ही भूमिका मांडली आहे.
युद्धाचा परिणाम
या हल्ल्यामुळे इराणची लष्करी रणनीती आणि नेतृत्व साखळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. तेहरानमधील या थेट प्रहारामुळे आता इराणकडून मोठ्या प्रमाणावर 'बॅलिस्टिक क्षेपणास्त्र' हल्ले होण्याची शक्यता लष्करी विश्लेषकांनी वर्तवली आहे.