इराणचा 'फतवा'! अमेरिका, इस्रायलला फोटो किंवा व्हिडिओ पाठवल्यास थेट फाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 15:11 IST2026-03-31T15:10:20+5:302026-03-31T15:11:28+5:30

Iran-Israel War : इराणने आपल्या नागरिकांसाठी कडक कायदा लागू केला असून शत्रू राष्ट्रांना माहिती दिल्यास मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.

Iran-Israel War: Iran's 'fatwa'! Direct execution if you send photos or videos to America, Israel; End of naval commander | इराणचा 'फतवा'! अमेरिका, इस्रायलला फोटो किंवा व्हिडिओ पाठवल्यास थेट फाशी

इराणचा 'फतवा'! अमेरिका, इस्रायलला फोटो किंवा व्हिडिओ पाठवल्यास थेट फाशी

मध्य पूर्व आशियातील युद्ध आता एका अत्यंत भीषण टप्प्यावर पोहोचले आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने आपल्या नागरिकांसाठी अत्यंत कडक आणि प्राणघातक इशारा जारी केला आहे. शत्रू राष्ट्रांना कोणत्याही प्रकारची माहिती पुरवल्यास आता थेट मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल, असे इराणने स्पष्ट केले आहे.

इराणच्या न्यायव्यवस्थेचे प्रवक्ते असगर जहांगीर यांनी माहिती दिली की, गेल्या ऑक्टोबरमध्ये सुधारित करण्यात आलेल्या 'हेरगिरी कायद्या'नुसार आता कडक कारवाई केली जाईल. जर कोणत्याही नागरिकाने अमेरिका किंवा इस्रायलसारख्या 'शत्रू सरकारांना' इराणमधील परिस्थितीचे फोटो किंवा व्हिडिओ पाठवले, तर त्याला फाशीची शिक्षा दिली जाईल. इतकेच नाही तर संबंधित व्यक्तीची सर्व संपत्ती देखील जप्त केली जाणार आहे. युद्धाच्या काळात अंतर्गत माहिती बाहेर जाऊ नये म्हणून इराणने देशातील इंटरनेट बंद ठेवलेले आहे. तरीही माहिती जात आहे, यासाठी इराणने हे पाऊल उचलले आहे.

धार्मिक केंद्रावर भीषण हल्ला
उत्तर-पश्चिमी इराणमधील झंजन शहरावर अमेरिका आणि इस्रायलने हवाई हल्ले केले आहेत. 'फार्स' या वृत्तसंस्थेनुसार, या हल्ल्यात झंजन येथील प्रसिद्ध 'आजम हुसैनीया' या धार्मिक केंद्राच्या सोन्याच्या घुमटाचे आणि मिनारांचे मोठे नुकसान झाले आहे. हल्ल्यानंतर इराणच्या रेड क्रिसेंट सोसायटीने तातडीने बचाव कार्य सुरू केले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमींना तेहरानमधील रुग्णालयांमध्ये हलवण्यात येत आहे.

नौसेना कमांडर तंगसिरी यांना अखेरचा निरोप
इराणसाठी सर्वात मोठा धक्का म्हणजे रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे नौसेना कमांडर अलीरेजा तंगसिरी यांचा मृत्यू. इस्रायलने केलेल्या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तंगसिरी यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. आज बंदर अब्बास येथे त्यांच्या अंत्ययात्रेसाठी हजारो इराणी नागरिकांनी गर्दी केली होती. तंगसिरी हे इराणच्या नौदलातील अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व मानले जात होते.

Web Title: Iran-Israel War: Iran's 'fatwa'! Direct execution if you send photos or videos to America, Israel; End of naval commander