'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:53 IST2025-06-26T13:52:22+5:302025-06-26T13:53:03+5:30
Iran-Israel War: इराणी तेलावर डोळा ठेवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन काय आहे?

'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
Iran-Israel War: अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेले इराण-इस्रायलयुद्ध शांत झाले. दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाल्यापासून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणबद्दलचा कट्टर दृष्टिकोन बदललेला दिसतोय. ते वारंवार इराणमध्ये उपलब्ध असलेल्या तेलाबद्दल बोलत आहेत. पाश्चात्य देशांची संरक्षण संघटना नाटोच्या पत्रकार परिषदेत इराणी तेलावरील निर्बंध शिथिल करण्याच्या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले की, 'युद्धानंतर आता इराणला पैशांची आवश्यकता आहे.' ट्रम्प यांच्या टिप्पणीचा थेट अर्थ असा होता की, ते इराणी तेलावरील निर्बंध शिथिल करण्यास तयार आहेत.
ट्रम्प यांचे इराण तेलावर भाष्य
पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, 'इराण नुकताच युद्धातून बाहेर पडला आहे. त्यांनी युद्ध खूप धैर्याने लढले. ते तेलाचा व्यवसाय करतात. मला हवे असेल तर मी त्यांना हे करण्यापासून रोखू शकतो आणि स्वतः चीनला तेल विकू शकतो, पण मला हे करायचे नाही. देशाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी त्यांना पैशांची गरज आहे. त्यांना तेल विकायचे असेल तर ते ते विकतील. आम्ही तेल जप्त किंवा निर्बंध लादणार नाही,' असे सूचक विधान त्यांनी यावेळी केले.
इराणी तेलावर ट्रम्प यांचा डोळा
विशेष म्हणजे, दोन्ही देशांमधील युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी तेलाचा उल्लेख करत म्हटले होते की, इराणकडे भरपूर तेल आहे. ट्रम्प यांनी तीन दिवसांत तीन वेळा इराणी तेलाचा उल्लेख केला, ज्यावरून स्पष्ट होते की, इराणबाबत त्यांच्या परराष्ट्र धोरणात बदल झाला आहे. या बदलामागील मुख्य कारण म्हणजे इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि होर्मुझची मार्ग बंद होण्याची भीती. इराणी तेलावर निर्बंध असले तरी, त्याचे तेल अप्रत्यक्षपणे बाजारात पोहोचते, ज्यामुळे तेलाचे दर स्थिर राहिले. परंतु इराण-इस्रायल युद्ध सुरू होताच, तेलाच्या किमती अचानक वाढल्या. वाढत्या तेलाच्या किमतींमुळे अमेरिकेसह जगभरातील देशांना त्रास झाला.
तेल खरेदीला अमेरिकेचा हिरवा कंदील
इराण-इस्रायल युद्धापूर्वी ट्रम्प कोणत्याही देशाला बंदी घातलेले इराणी तेल खरेदी करण्यास कडक विरोध करत होते. असे असूनही, चीन अप्रत्यक्ष मार्गाने गुप्तपणे इराणी तेल खरेदी करायचा, अजूनही करतो. चीन इराणी तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. इराणी तेलावरील नेहमीच विरोध करत आला आहे. ट्रम्प यांनी इराणी तेल खरेदी केल्याबद्दल अनेक स्वतंत्र तेल शुद्धीकरण कंपन्या आणि चीनच्या पोर्ट टर्मिनल ऑपरेटरवरही निर्बंध लादले होते. परंतु मंगळवारी, नाटो शिखर परिषदेला जाताना ट्रम्प म्हणाले की, चीन इराणकडून तेल खरेदी करू शकतो.
ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, चीन आता इराणकडून तेल खरेदी करणे सुरू ठेवू शकतो. आशा आहे की, ते (चीन) अमेरिकेकडूनही भरपूर तेल खरेदी करतील. ट्रम्प यांच्या विधानावर व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मीडियाला सांगितले की, ट्रम्प हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत की, इराणने अद्याप होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. असे झाले असते, तर चीनला फटका बसला असता.