इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 11:08 IST2026-01-12T11:07:47+5:302026-01-12T11:08:19+5:30
इराणमध्ये बंडाची आग धगधगली! ५०० आंदोलकांचा मृत्यू, आता डोनाल्ड ट्रम्प 'अॅक्शन मोड'मध्ये; लष्करी हल्ल्याची तयारी?

इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
इराणमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या जनक्षोभाने आता हिंसक वळण घेतले आहे. सरकारविरोधी निदर्शनांना चिरडण्यासाठी इराणी सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत ५०० हून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रक्तपातामुळे जगभरातून संताप व्यक्त होत असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दांत इशारा दिला आहे. इराणमधील ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून आता ट्रम्प प्रशासन थेट लष्करी हस्तक्षेपाच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
ट्रम्प यांच्या टेबलावर हल्ल्याची योजना
सीएनएनच्या वृत्तानुसार, इराणमधील मृतांचा आकडा ५०० पार गेल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसोबत महत्त्वाची बैठक बोलावली असून, इराणविरुद्ध कोणत्या प्रकारचे पाऊल उचलावे, याचे विविध पर्याय त्यांच्यासमोर ठेवण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने इराणी सुरक्षा दलांच्या तळांवर मर्यादित हवाई हल्ले करणे किंवा त्यांच्या लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे, या पर्यायांचा समावेश आहे.
सायबर अटॅक आणि स्टारलिंकची मदत?
केवळ लष्करीच नव्हे, तर 'नॉन-मिलिटरी' पर्यायांवरही अमेरिका विचार करत आहे. इराण सरकारने देशात इंटरनेटवर बंदी घातली असून माहितीची कोंडी केली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी एलन मस्क यांच्या 'स्टारलिंक' सॅटेलाइट इंटरनेटची मदत आंदोलकांना देण्याबाबत चर्चा सुरू आहे. याशिवाय, इराणच्या बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्रावर सायबर हल्ले करून तिथली व्यवस्था कोलमडवून टाकण्याची योजनाही आखली जात आहे.
इराणचा उलट इशारा; 'आमच्या वाटेला जाल तर...'
दुसरीकडे, अमेरिकेच्या धमक्यांना इराणनेही जशास तसे उत्तर दिले आहे. इराणच्या संसदेचे नेते मोहम्मद बाकेर कालीबाफ यांनी स्पष्ट केले आहे की, जर अमेरिकेने इराणच्या अंतर्गत विषयात लष्करी हस्तक्षेप केला, तर मध्यपूर्वेतील अमेरिकेचे सर्व लष्करी तळ आणि व्यापारी जहाजे आमच्या निशाण्यावर असतील. "आम्ही केवळ हल्ल्याची वाट पाहणार नाही, तर प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहोत," असे इराणने म्हटले आहे.
काय आहे सध्याची परिस्थिती?
इराणमध्ये मृतांची संख्या ५००च्या वर पोहोचली आहे. तर, १०६०० पेक्षा जास्त आंदोलकांना तुरुंगात डांबले आहे. इराणमधील हुकूमशाही राजवट संपवून लोकशाही प्रस्थापित करण्याची आंदोलकांची मागणी आहे.
आता संपूर्ण जगाचे लक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगामी भूमिकेकडे लागले आहे. मंगळवारी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीनंतर अमेरिका इराणवर थेट हल्ला करणार की कडक आर्थिक निर्बंध लादून त्यांना जेरीस आणणार, हे स्पष्ट होईल. मात्र, या तणावामुळे आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग गडद झाले आहेत.