जळतोय इराण, होरपळतोय लेबनॉन; युद्धाच्या ठिणगीने शांतता भस्मसात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 04:48 IST2026-03-06T04:47:50+5:302026-03-06T04:48:25+5:30
हिजबुल्लाच्या सहभागाने तणाव वाढला, लेबनॉनला पुन्हा संघर्षाच्या व अस्थिरतेच्या खाईत लोटले

जळतोय इराण, होरपळतोय लेबनॉन; युद्धाच्या ठिणगीने शांतता भस्मसात!
पेनसिल्व्हेनिया : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात झालेला मृत्यू आणि इराणवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये मोठ्या प्रयत्नाने स्थापित झालेली शांतता धोक्यात आली आहे. विश्लेषकांच्या मते, इराण पुरस्कृत ‘हिजबुल्ला’ या शिया निमलष्करी संघटनेने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांमुळे लेबनॉनला पुन्हा एकदा मोठ्या संघर्षाच्या आणि अस्थिरतेच्या खाईत लोटले आहे.
खामेनेई यांच्या मृत्यूनंतर लेबनॉनमधून हिजबुल्लाने उत्तर इस्रायलवर रॉकेट डागले. याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने दक्षिण लेबनॉन, बैरूत आणि बेका व्हॅलीतील हिजबुल्लाच्या तळांवर नव्याने हवाई हल्ले केले. तज्ज्ञांच्या मते, हिजबुल्ला आता पूर्वीइतकी शक्तिशाली राहिली नसली, तरी तिच्या या कारवाया लेबनॉनला गंभीर संकटात टाकू शकतात. हिजबुल्लाच्या या कारवायांचा फायदा घेत इस्रायल किंवा सीरिया लेबनॉनमध्ये सैन्य घुसवू शकते.
हिजबुल्लाचा इतिहास आणि वर्तमान
हिजबुल्लाची स्थापना १९८५ मध्ये इराणच्या क्रांतीतून प्रेरणा घेऊन झाली होती. गेल्या चार दशकांत या संघटनेने लेबनॉनचे राजकारण आणि परराष्ट्र धोरणावर खोलवर प्रभाव पाडला आहे.
लेबनॉनमध्ये अंतर्गत कलह
हिजबुल्लाने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये अंतर्गत विरोध वाढला. अनेक राजकीय नेत्यांनी हिजबुल्ला लेबनॉनच्या हितापेक्षा इराणच्या हिताला प्राधान्य देत असल्याचा आरोप केला. अशा परिस्थितीत २ मार्च रोजी लेबनॉन सरकारने पहिल्यांदाच हिजबुल्लाच्या लष्करी कारवायांवर अधिकृत बंदी घातली.
क्षेत्रीय तणाव वाढणार
तज्ज्ञांनुसार, या बंदीमुळे देशात जातीय तणाव वाढू शकतो, कारण लेबनॉनची एक तृतीयांश लोकसंख्या शिया समुदायाची आहे. दरम्यान, सीरियाने लेबनॉनच्या उत्तर सीमेवर आपली लष्करी उपस्थिती वाढवली आहे, तर इस्रायलने सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत जमिनीवरून हल्ला करण्याचे संकेत दिले आहेत.