Iran Israel News: इराणचे इस्रायलवर क्लस्टर बॉम्ब
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 11:49 IST2025-06-21T11:48:12+5:302025-06-21T11:49:40+5:30
Iran Israel Conflict: अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्यास किरणोत्सर्ग होण्याची भीती वाढली, लष्करी तळ टार्गेट

Iran Israel News: इराणचे इस्रायलवर क्लस्टर बॉम्ब
तेल अवीव: इस्रायल-इराण यांच्यात १३ जूनपासून सुरू असलेल्या युद्धाला आठवडा पूर्ण होत असतानाच शुक्रवारी दोन्ही देशांनी एकमेकांवर पुन्हा हल्ले चढवले. इराणनेइस्रायलवरील हल्ले वाढवले असून, इस्रायलमधील बेर्शेबा येथे झालेल्या ताज्या हल्ल्यात इराणने क्लस्टर बॉम्बचा वापर केला आहे. इराणने क्लस्टर बॉम्ब वॉरहेड असलेली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इस्रायलवरील ताज्या हल्ल्यांमध्ये लष्करी तळ, संरक्षण उद्योग, कमांड आणि नियंत्रण केंद्रांना लक्ष्य केल्याचे इराणच्या लष्कराने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने म्हटले की इराणच्या बुशहर अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्यास किरणोत्सर्ग होण्याची भीती आहे. तेहरानमध्ये नमाजानंतर हजारो लोकांनी इस्रायलविरुद्ध निदर्शने केली आणि त्यांच्या नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. इराणविरुद्ध अमेरिकेच्या धमक्यांबद्दलही घोषणा देण्यात आल्या. लोकांनी इराण, पॅलेस्टाईनचे झेंडेही फडकावले. एका निदर्शकाने सर्वोच्च नेते खामेनी यांच्या समर्थनार्थ बॅनरवर लिहिले होते, 'मी माझ्या नेत्यासाठी माझा जीव देईन. (वृत्तसंस्था)
दुसऱ्या महायुद्धाची आठवण
इराणकडून होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या भीतीने इस्रायलमधील नागरिक भूमिगत रेल्वे स्टेशनमध्ये आश्रय घेत आहेत. सायरन वाजू लागल्यावर पळावे लागते, त्यामुळे नागरिक सुरक्षित जागा शोधू लागले आहेत. रेल्वे स्टेशनमध्ये आश्रय घेत असलेल्या अनेकांना दुसऱ्या महायुद्धाच्या गोष्टी आठवत आहेत.
क्षेपणास्त्र प्रकल्पांवर हल्ले
इस्रायलच्या ६०हून अधिक विमानांनी इराणमध्ये क्षेपणास्त्रनिर्मिती करणारे प्रकल्प आणि एसपीएनडी ही संशोधन संस्था यावर हल्ले केले तसेच केरमंशाह, तब्रीझ आणि रश्त या शहरांनाही लक्ष्य केले. इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्यांनी सांगितले की इराणमधील अनेक ठिकाणांवर, विशेषतः तेहरानमध्ये हल्ले करणार आहोत.