इराणचा भूकंप नैसर्गिक आपत्ती की अणु चाचणी? युद्ध आणखी तीव्र होण्याच्या मार्गावर? संशय वाढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 16:38 IST2026-03-03T16:37:58+5:302026-03-03T16:38:52+5:30
Iran Nuclear Test Or Earthquake: या युद्धाचे रूपांतर अणुयुद्धात होणार तर नाही ना, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

इराणचा भूकंप नैसर्गिक आपत्ती की अणु चाचणी? युद्ध आणखी तीव्र होण्याच्या मार्गावर? संशय वाढला
Iran Nuclear Test Or Earthquake: इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धात आखातात अनेक आघाड्यांवर पसरलेले दिसून आले. इराणचे समर्थन असलेल्या हिजबोल्लाह व अन्य बंडखोर गटांनी इस्रायल, अरब राष्ट्रांतील अमेरिकेचे सैन्यतळावर क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायल व अमेरिकेने इराणवर भीषण तुफान बॉम्बफेक सुरूच ठेवली आहे. या संघर्षामुळे हजारो प्रवासी विविध देशांत अडकले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची हत्या आणि कोणत्याही 'एक्झिट प्लॅन'चा अभाव यामुळे हा संघर्ष लवकर संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. अद्यापही हल्ले सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच इराणमध्ये भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे. हा भूकंप म्हणजे नक्की नैसर्गिक आपत्ती होती की, इराणने ऐन युद्धात अणु चाचणी केली, यावर आता शंका उपस्थित केली जात आहे.
आधीच युद्धाच्या भीषण आगीत होरपळत असणाऱ्या इराणमध्ये आता भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इराणमधील 'गेराश' भागात ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने (USGS) दिली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू १० किलोमीटर जमिनीखाली होता. ज्या गेराश भागात हा भूकंपाचे धक्के जाणवले, ते ठिकाण दक्षिण इराणमधील महत्त्वाचे ऊर्जा प्रकल्प, बंदर आणि लष्करी तळांना जोडणाऱ्या एका महत्त्वाच्या कॉरिडॉरवर स्थित आहे. विशेष म्हणजे गचीन युरेनियम खाण या ठिकाणापासून साधारण १५०-१८० किलोमीटर अंतरावर आहे, जी इराणच्या युरेनियम स्त्रोतांपैकी एक महत्त्वाची खाण आहे. इराणचा 'बुशहर' हा अणुऊर्जा प्रकल्प देखील गेराशपासून २५०-३०० किलोमीटर अंतरावर नेऋत्तेला आहे. सुदैवाने, या भूकंपामुळे अणुकेंद्रांचे नुकसान झाल्याची किंवा किरणोत्सर्गाची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
५-मेगाटन चाचणी ६.९ तीव्रतेचा भूकंप निर्माण करू शकते
इराण भूकंपप्रवण क्षेत्रात येतो, त्यामुळे असे भूकंप सामान्य आहेत, असे मानले जाते. अणुचाचण्यांमुळे भूकंप होऊ शकतात, परंतु त्यांच्या लहरी आणि वैशिष्ट्ये नैसर्गिक भूकंपांपेक्षा वेगळी असतात. अणुस्फोटामुळे होणाऱ्या भूकंपाची तीव्रता त्याच्या शक्तीवर अवलंबून असते. म्हणजे ५-मेगाटन चाचणी ६.९ तीव्रतेचा भूकंप निर्माण करू शकते, परंतु हे चाचणीच्या खोलीवर अवलंबून असते, असे सांगितले जाते. अणुचाचण्यांमुळे ४.५ ते ७+ तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो. लहान चाचणी (१-५ किलोटन): ४.५–५.५, मध्यम (२०-५० किलोटन): ५.५–६.५, मोठे (१ मेगाटन+): ६.५–७+
दरम्यान, इराणने म्हटले आहे की, त्यांच्याकडे ४६० किलोग्रॅम ६० टक्के समृद्ध युरेनियम आहे, जे ११ अणुबॉम्ब बनवण्यासाठी पुरेसे आहे, असे अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी सांगितले होते होते. तसेच इराणच्या सर्वोच्च नेत्याचे जवळचे विश्वासू मोहम्मद-जवाद लारीजानी म्हणाले की, गरज पडल्यास इराण २४ तासांच्या आत लष्करी अणु क्षमता विकसित करू शकतो. एकंदरीत, इराणकडे शस्त्रास्त्रे असल्याने प्रादेशिक युद्धाचे रूपांतर अणुयुद्धात होऊ शकते, ज्यामुळे अमेरिका आणि इस्रायलला जिंकणे कठीण होईल, असा दावा काही मिडिया रिपोर्टमधून करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.