दुबईच्या जगप्रसिद्ध हॉटेल बुर्ज अल अरबवर इराणचा ड्रोन आदळला; आगीचे लोट, Video सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 05:45 IST2026-03-01T05:43:53+5:302026-03-01T05:45:43+5:30
Iran drone attack Dubai : दुबईचे आयकॉनिक ७-स्टार हॉटेल बुर्ज अल अरबवर इराणचे ड्रोन पडले! आगीचे व्हिडिओ व्हायरल. इराण-इस्रायल युद्धाचा दुबई पर्यटनाला सर्वात मोठा फटका. वाचा सविस्तर वृत्त.

दुबईच्या जगप्रसिद्ध हॉटेल बुर्ज अल अरबवर इराणचा ड्रोन आदळला; आगीचे लोट, Video सोशल मीडियावर व्हायरल
दुबई: इराण आणि इस्रायलमधील युद्धाची धग आता दुबईच्या सर्वात आलिशान वास्तूंपर्यंत पोहोचली आहे. दुबईची शान मानले जाणारे आणि जगातील एकमेव सेव्हन स्टार हॉटेल 'बुर्ज अल अरब' वर इराणच्या एका 'कामिकाझे' ड्रोनने धडक दिली. या हल्ल्यामुळे हॉटेलच्या काही भागाला भीषण आग लागली असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणने डागलेले एक ड्रोन नष्ट करण्यात आले. परंतू ते बुर्ज अल अरब हॉटेलच्या बाहेरील भागावर आदळले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या वरच्या मजल्यांवरून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट निघताना दिसत आहेत.
दुबई मीडिया ऑफिसने स्पष्ट केले आहे की, हवाई संरक्षण यंत्रणेने ड्रोन रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे अवशेष हॉटेलवर पडल्याने ही आग लागली. सिव्हिल डिफेन्सच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या घटनेत अद्याप कोणत्याही जीवितहानीचे अधिकृत वृत्त नाही, मात्र हॉटेलमधील पाहुण्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
पर्यटनाला मोठा फटका
दुबईची ओळख असलेल्या या हॉटेलवर हल्ला झाल्याने यूएईमधील पर्यटनाला मोठा धक्का बसला आहे. या आधी दुबई विमानतळावरही हल्ला झाला होता, त्यानंतर आता बुर्ज अल अरब लक्ष्य झाल्याने संपूर्ण शहरात घबराटीचे वातावरण आहे.
JUST IN: 🇮🇷🇦🇪 Iran strikes renowned Burj Al-Arab hotel in Dubai, UAE. pic.twitter.com/dHRKbfibat
— BRICS News (@BRICSinfo) February 28, 2026
इराणचे लक्ष्य का? इराणने अमेरिकन तळांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला होता, मात्र दुबईतील नागरी आणि व्यावसायिक वास्तूंना लक्ष्य केल्यामुळे आता हे युद्ध थेट जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि पर्यटनावर घाला घालत असल्याचे स्पष्ट झाले आहे.