इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; आंदोलकांना थेट मृत्युदंडाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 13:55 IST2026-01-11T13:54:33+5:302026-01-11T13:55:32+5:30
Iran Crisis: आंदोलनात आतापर्यंत 116 लोकांचा मृत्यू!

इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; आंदोलकांना थेट मृत्युदंडाचा इशारा
Iran Crisis: इराणमधील सरकारविरोधी आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालले आहे. 28 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या आंदोलनांनी आता संपूर्ण देश व्यापला असून, आतापर्यंत किमान 116 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2,600 हून अधिक नागरिकांना अटक करण्यात आली आहे. आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या हिंसक चकमकींमुळे परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे.
सरकारची कठोर भूमिका
राजधानी तेहरानमध्ये सुरू झालेले आंदोलन आता देशातील अनेक प्रांतांमध्ये पसरले आहे. आंदोलक रस्त्यावर उतरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ, सरकारी मालमत्तेचे नुकसान आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आंदोलकांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. देशाचे अॅटर्नी जनरल मोहम्मद मोवाहेदी आजाद यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांना ‘मोहारेब’ (खुदाचा शत्रू) ठरवले जाईल, असा इशारा दिला आहे.
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, इराणी कायद्यानुसार अशा आरोपांखाली दोषी आढळल्यास मृत्युदंड दिला जाऊ शकतो. सरकारी वृत्तवाहिनीवर प्रसारित निवेदनात दंगेखोरांना मदत करणाऱ्यांनाही तितकीच कठोर शिक्षा भोगावी लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कायद्यातील तरतुदी काय सांगतात?
इराणी दंडसंहितेच्या कलम 186 नुसार, इस्लामिक रिपब्लिकविरोधात सशस्त्र उठाव करणाऱ्या कोणत्याही गटाला मदत करणाऱ्या व्यक्तीला ‘मोहारेब’ ठरवले जाऊ शकते. तसेच, कलम 190 अंतर्गत अशा गुन्ह्यासाठी फाशी, अवयव छाटणे किंवा कायमस्वरुपी निर्वासनासारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे.
इंटरनेट सेवा बंद, जगापासून तुटले नागरिक
परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून इराणी सरकारने देशभरात इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. यामुळे इराणमधील नागरिक आंतरराष्ट्रीय ऑनलाइन सेवा आणि सोशल मीडियापासून पूर्णपणे तुटले गेले आहेत. माहितीचा प्रवाह रोखण्याचा हा प्रयत्न असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मृतांचा आकडा वाढतोय
असोसिएटेड प्रेस (AP) च्या माहितीनुसार, आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत किमान 116 जणांचा मृत्यू झाला आहे. चहारमहल आणि बख्तियारी, इलाम, केरमानशाह, फार्स या प्रांतांमध्ये मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी झाली आहे. राजधानी तेहरानमध्येही अनेक आंदोलक मारले गेल्याचे वृत्त आहे.
अमेरिकेचा इशारा
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत त्यांनी म्हटले की, “इराण आज कधी नव्हे इतके स्वातंत्र्य पाहत आहे. अमेरिका मदतीसाठी तयार आहे.” ट्रम्प यांची ही टिप्पणी अशा वेळी आली आहे, जेव्हा अयातुल्ला खामेनेई यांनी यापूर्वीच अमेरिका आणि ट्रम्प यांच्यावर इराणी नागरिकांच्या रक्तपाताचा आरोप केला होता.
परिस्थिती आणखी बिघडणार?
इराणमधील आंदोलन केवळ आर्थिक किंवा सामाजिक असंतोषापुरते मर्यादित न राहता आता राजकीय बंडाच्या दिशेने जात असल्याचे संकेत मिळत आहेत. सरकारची कठोर भूमिका आणि मृत्युदंडाच्या धमक्या परिस्थिती अधिक गंभीर करू शकतात. इंटरनेट बंदीमुळे माहितीवर पडदा टाकला जात असला, तरी आंतरराष्ट्रीय दबाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या काळात इराणमधील परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.