भारतातील सीएनजी-पीएनजी पुरवठ्यावर मोठे संकट; होर्मुझ सामुद्रधुनीत तणावामुळे जहाजे अडकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 04:35 IST2026-03-05T04:35:32+5:302026-03-05T04:35:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे कतारमधील जगातील सर्वांत मोठ्या ऊर्जा प्रकल्पातील उत्पादन बंद झाले ...

भारतातील सीएनजी-पीएनजी पुरवठ्यावर मोठे संकट; होर्मुझ सामुद्रधुनीत तणावामुळे जहाजे अडकली
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : इराणने केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे कतारमधील जगातील सर्वांत मोठ्या ऊर्जा प्रकल्पातील उत्पादन बंद झाले आहे. त्यामुळे कतारकडून भारताला होणारा एलएनजी गॅसचा पुरवठा ठप्प होण्याच्या मार्गावर असून, देशातील औद्योगिक आणि शहरी गॅस वापरावर ४० टक्केपर्यंत कपात लादण्यात आली आहे.
‘होर्मुझची सामुद्रधुनी’ हा सागरी मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. कतारचे ‘रास लफान’ हे मुख्य लोडिंग बंदर याच मार्गावर असल्याने भारताचे ‘पेट्रोनेट एलएनजी’चे टँकर तिथे पोहोचू शकत नाहीत. पेट्रोनेट व कतारएनर्जी या दोन्ही कंपन्यांनी एकमेकांना ‘फोर्स मेज्योर’ ची नोटीस बजावली आहे.
पुरवठा साखळी धोक्यात
भारताच्या एकूण कच्चे तेल आयातीपैकी ५० टक्के आणि एलएनजी पुरवठ्यापैकी ५४ टक्के हिस्सा हॉर्मुजच्या सामुद्रधुनीतून येतो. हा मार्ग बंद झाल्याने गेल, आयओसी आणि बीपीसीएल यांसारख्या कंपन्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
२.७ कोटी टन एलएनजी भारत वर्षाला आयात करतो. त्यातील सुमारे ४० टक्के पुरवठा एकट्या कतारकडून होतो.
भारतावर परिणाम काय?
पुरवठ्यात ६०% घट : शहरी गॅस वितरण कंपन्यांच्या स्वस्त गॅस पुरवठ्यात ६० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.
दुप्पट किमतीचा फटका : कतारच्या स्वस्त गॅसऐवजी आता आंतरराष्ट्रीय बाजारातून २५ डॉलर प्रति एमएमबीटीयू दराने महागडा गॅस खरेदी करावा लागेल.
सीएनजी-पीएनजी महागणार का?
गॅसच्या किमती दुपटीने वाढल्यास सीएनजीचे दर पेट्रोलच्या जवळ पोहोचण्याची भीती आहे. यामुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळू शकतात, असा इशारा ‘असोसिएशन ऑफ सीजीडी एंटिटीज’ने दिला आहे.
अमेरिकेत एका रात्रीतच पेट्रोलच्या दरात मोठी वाढ
अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता जागतिक इंधन बाजारावर दिसू लागला आहे. अमेरिकेत एका रात्रीत पेट्रोलच्या सरासरी दरात ११ सेंटची मोठी वाढ झाली असून, आता तिथे पेट्रोल ३.११ डॉलर प्रति गॅलनवर पोहोचले आहे. ‘अमेरिकन ऑटोमोबाइल असोसिएशन’ने ही माहिती दिली आहे.
इराणच्या हल्ल्यांमुळे, विशेषतः सौदी अरेबियातील अमेरिकन दूतावासावर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींनी गेल्या वर्षभरातील उच्चांकी स्तर गाठला आहे. अमेरिकन क्रूड ऑइल ८.६ टक्क्यांनी वधारून ७७.३६ डॉलर प्रतिबॅरल झाले, तर ब्रेंट क्रूड ६.७ टक्क्यांनी वाढून ८१.२९ डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले.