भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 05:12 IST2025-11-25T05:11:29+5:302025-11-25T05:12:40+5:30
Laxmi Niwas Mittal: ब्रिटनमधील नव्या सरकारने श्रीमंतांसाठी कडक कर धोरण आणल्यानंतर भारतीय वंशाचे उद्योगपती लक्ष्मी मित्तल ब्रिटन सोडून दुबईत राहण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. मित्तल यांचे कर-निवासस्थान सध्या स्वीत्झर्लंडमध्ये आहे; पण पुढे ते जास्त वेळ दुबईत घालवणार आहेत.

भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
लंडन - ब्रिटनमधील नव्या सरकारने श्रीमंतांसाठी कडक कर धोरण आणल्यानंतर भारतीय वंशाचे उद्योगपती लक्ष्मी मित्तल ब्रिटन सोडून दुबईत राहण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. मित्तल यांचे कर-निवासस्थान सध्या स्वीत्झर्लंडमध्ये आहे; पण पुढे ते जास्त वेळ दुबईत घालवणार आहेत.
मित्तल यांच्या टीमने याबाबत अधिक माहिती दिली नसली तरी या निर्णयामागील एक प्रमुख कारण म्हणजे ब्रिटनचा नॉन-डोमिसाइल्ड (नॉन-डोम) कर दर्जा रद्द करणे असल्याचे बोलले जाते. ही सवलत असल्याने श्रीमंतांना फक्त ब्रिटनमध्ये कमावलेल्या उत्पन्नावर कर भरावा लागत असे. २६ नोव्हेंबरला अर्थसंकल्पात हा ‘सुपर रिच टॅक्स’ मंजूर होण्याची शक्यता आहे. स्थानिक माध्यमांनुसार, ब्रिटन सोडणाऱ्या व्यक्तींना २० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कर द्यावा लागू शकतो. नव्या कर धोरणामुळे ब्रिटन आता गुंतवणूक आणि संपत्ती वाढवण्यासाठी पूर्वीसारखे आकर्षक राहत नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. (वृत्तसंस्था)
चिंता काय?
लक्ष्मी मित्तल यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची चिंता वारसा कर आहे. वारसा कर म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची मालमत्ता वारसांना देताना लावला जाणारा कर. येथे ३२५,००० पाउंडपेक्षा जास्त संपत्तीवर ४०% कर लागू शकतो. दुबई व स्वीत्झर्लंडमध्ये हा वारसा कर नाही. यामुळे मित्तल आता दुबईस प्राधान्य देत आहेत. मित्तल यांचे दुबईच्या एमीरेट्स हिल्स या सर्वात महागड्या भागात आलिशान महाल आहे. त्यांनी दुबईतील रिअल इस्टेट प्रकल्पांत गुंतवणूक केली आहे.