भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 12:06 IST2025-11-21T12:04:07+5:302025-11-21T12:06:50+5:30
ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स २०२५ मध्ये पाकिस्तानी नौदल १४५ देशांपैकी ३३ व्या क्रमांकावर आहे तर भारतीय नौदल जगात ७ व्या क्रमांकावर आहे.

भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
कोलंबो - जर भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धनौका एखाद्या बंदरावर आमने-सामने आल्या तर काय होईल? विचारात पडला ना...परंतु कोलंबोमध्ये हे घडले आहे. भारतीय नौदलाचं ऑफशोर पेट्रोल जहाज INS सुकन्या ऑपरेशनल टर्नराऊंड OTR मध्ये कोलंबो बंदरावर पोहचलं होते, त्याचवेळी पाकिस्तानी नौदलाचं फ्रिगेट PNS सैफ जहाज इंधन भरण्यासाठी तिथे आले. दोन्ही देशात सुरु असलेला संघर्ष आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर एकाच बंदरावर दोन्ही देशाच्या युद्धनौका समोरासमोर येणे हा चर्चेचा विषय बनला आहे.
श्रीलंकेच्या नौदलाने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, आयएनएस सुकन्या मंगळवारी कोलंबोमध्ये पोहोचली. श्रीलंकेच्या नौदलाने त्याचे पारंपारिक, औपचारिक स्वागत केले. या जहाजाचे नेतृत्व कमांडर संतोष कुमार वर्मा करत आहेत. १०१ मीटर लांबीचे हे जहाज एँन्टी एअरक्राफ्ट गनने सुसज्ज आहे आणि त्यात हेलिकॉप्टर लँडिंग आणि टेकऑफ क्षमता आहे. यावेळी भारतीय कर्मचारी श्रीलंकेच्या नौदलासोबत मैत्रीपूर्ण कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील आणि श्रीलंकेतील प्रमुख पर्यटन स्थळांना भेट देतील. दौरा पूर्ण झाल्यानंतर आयएनएस सुकन्या शुक्रवारी कोलंबोहून रवाना होईल.
दुसरीकडे, पाकिस्तानी नौदलाचे पीएनएस सैफ त्याच दिवशी इंधन घेण्यासाठी आले आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी रवाना झाले. श्रीलंकेच्या नौदलाने परंपरेनुसार तिला निरोप दिला. पीएनएस सैफ हे १२३ मीटर लांबीचे आधुनिक फ्रिगेट आहे ज्याचे नेतृत्व कॅप्टन असफंद फरहान खान करत आहेत. एकाच बंदरात दोन्ही शत्रू देशांच्या युद्धनौकांचे एकत्र दर्शन एक दुर्मिळ आणि रंजक दृश्य होते.
दरम्यान, जर नौदलाच्या ताकदीच्या बाबतीत बोलायचं झालं तर, ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स २०२५ मध्ये पाकिस्तानी नौदल १४५ देशांपैकी ३३ व्या क्रमांकावर आहे तर भारतीय नौदल जगात ७ व्या क्रमांकावर आहे. भारताकडे दोन विमानवाहू जहाजे आहेत (INS विक्रमादित्य आणि स्वदेशी INS विक्रांत) तर पाकिस्तानकडे एकही विमानवाहू जहाज नाही. भारताकडेही विध्वंसक जहाजांची संख्या खूप जास्त आहे. आपल्याकडे १२ विध्वंसक जहाजे आहेत, तर पाकिस्तानकडे फक्त तीन आहेत.