कराची - पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूर हाती घेण्यात आले. या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यात पुलवामा हल्ल्यातील युसूफ अजहर, अब्दुल मलिक रौफ, मुदस्सिर अहमद यांचा समावेश आहे. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानातील दहशतवादी अड्डाच उद्ध्वस्त केला आहे. भारत-पाकिस्तान संघर्षात पाकिस्तानला मोठे नुकसान झाल्याने पाकिस्तानकडून युद्धविरामसाठी भारताकडे तयारी दाखवण्यात आली.
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
रविवारी रात्री उशिरा पाकिस्तानी नौदल, एअरफोर्स आणि सैन्य अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यात भारतासोबत संघर्षात त्यांचे एक लढाऊ विमान पाडले गेले अशी कबुली दिली. मात्र कोणत्या विमानाला किती नुकसान झाले, त्याचे नाव काय याचा उल्लेख त्यांनी टाळला. पीटीआयनुसार, पाक सैन्याचे प्रवक्ते लेफ्टिनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की, ही पत्रकार परिषद ऑपरेशन बुनयान-उल-मरसूसची कारवाई आणि त्याच्या निष्कर्षावर आधारित आहे. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या विमानाचं नुकसान झाले. त्याबाबत सविस्तर माहिती शेअर करू शकत नाही असं त्यांनी म्हटलं. या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने कुणी भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात आहे का असा सवाल विचारला त्यावर कुठलाही भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नाही असं त्यांनी स्पष्ट केले.
तसेच पाक सैन्याची कारवाई अचूक, संयमित आणि संतुलित होती. भारताकडून केलेल्या कारवाईला उत्तर देत पाकिस्तानी सैन्याने भारतातील २६ सैन्य तळांवर हल्ला केला. ज्यात वायूसेना आणि एविशन बेस यांचा समावेश होता असा पोकळ दावाही लेफ्टिनंट जनरल अहमद शरीफ यांनी पत्रकार परिषदेत केला. भारतातील सूरतगड, सिरसा, भुज, नालिया, उधमपूर, भटिंडा, बरनाला, अवंतिपुरा, श्रीनगर, जम्मू, अंबाला आणि पठाणकोट इथल्या भारतीय सैन्य ठिकाणांवर पाकिस्तानने हल्ला केला. त्याशिवाय ब्यास आणि नगरोटा इथल्या ब्रह्मोस मिसाइल स्टोअरेज केंद्रावरही हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानी सैन्याने केला. परंतु पाकिस्तानी सैन्याचा हा खोटा दावा भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यासह फेटाळला होता.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरमुळे लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मदच्या खालिद उर्फ अब्बू आकाशा, मुदस्सिर खाद्यान, मोहम्मद रसम खान आणि हाफिज मोहम्मद जमीलसह १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. या टॉपच्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी सैन्याचे बडे अधिकारीही उपस्थित झाल्याने जगासमोर पाकचा खरा चेहरा उघड झाला. पाकिस्तानच्या डीजीएमओने १० मे रोजी केलेल्या विनंतीमुळे भारताने युद्धविराम करण्याची सहमती दर्शवली. मात्र यापुढे दहशतवाद हा भारताविरोधात युद्ध म्हणून मानले जाणार आहे. तसेच सिंधु जल करारावरील स्थगितीही भारताने उठवली नाही. पाकिस्तान आणि भारत यांच्यात चर्चेनंतर पुढील निष्कर्ष काढले जाणार आहेत.