भारत-पाक युद्ध आता टळले, पण मला श्रेय मिळणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुलाखतीत व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 13:23 IST2025-05-18T13:22:14+5:302025-05-18T13:23:25+5:30
"मी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी केली आणि त्यांना युद्धाच्या उंबरठ्यावरून माघारी नेले. ही माझ्या राजकीय कारकिर्दीतील एक मोठी यशोगाथा आहे. पण..."

भारत-पाक युद्ध आता टळले, पण मला श्रेय मिळणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुलाखतीत व्यक्त केली खंत
न्यूयॉर्क : मी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी केली आणि त्यांना युद्धाच्या उंबरठ्यावरून माघारी नेले. ही माझ्या राजकीय कारकिर्दीतील एक मोठी यशोगाथा आहे. पण मला कधीच त्याचे श्रेय दिले जाणार नाही, अशी खंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, भारत, पाकिस्तानमध्ये प्रचंड द्वेष आहे. ते दोन्ही अण्वस्त्रधारी देश आहेत. संघर्ष सुरू झाल्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क साधला. दोघेही परस्परांवर क्षेपणास्त्रांचा मारा करत होते. आम्हीच अधिक सामर्थ्यवान असा त्या देशांचा दावा होता. त्यातून अण्वस्त्रांचा वापर होण्याचाही धोका वाढला होता.
ते म्हणाले की, परस्परांच्या विरोधात लढणाऱ्या भारत, पाकिस्तानशी मी व्यापाराबद्दल बोललो. शांतता प्रस्थापित करण्यासाठी मी व्यापार हा मुद्दा तुमच्यासमोर ठळकपणे मांडतोय, असेही त्यांना सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्तनावर भारतात टीका
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून उडवून दिले. त्यानंतर १० मे रोजी दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाली.
शस्त्रसंधी झाल्याची घोषणा दोन्ही देशांनी करण्याऐवजी डोनाल्ड ट्रम्प यांनीच केली. भारत व पाकिस्तानच्या चर्चेत अमेरिकेने मध्यस्थी केली, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या वर्तनावर भारतातील विरोधी पक्षांनी टीका केली.
भारत १००% टॅरीफ कमी करण्यास तयार
भारत सरकारने अमेरिकन वस्तूंवरील टॅरीफ १०० टक्के कमी करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे भारत व अमेरिकेत लवकरच व्यापार करार होणार असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. भारतासोबत व्यापार करार होणार असल्याचा दावा करीत असले तरी प्रस्तावित करारासाठी घाई नसल्याचे त्यांनी चॅनेलवरील मुलाखतीत सांगितले.
सर्वाधिक शुल्क लावणाऱ्या देशांपैकी भारत एक असल्याचा आरोप पुन्हा एकदा ट्रम्प यांनी केला. अशा परिस्थितीत व्यापार करणे जवळपास अशक्य असल्याचे स्पष्ट करीत भारत १०० टक्के टॅरीफ कमी करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.