2026 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता; अमेरिकन थिंक टँकचा धक्कादायक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:05 IST2025-12-31T11:57:52+5:302025-12-31T12:05:14+5:30
थिंक टॅंकच्या अहवालानुसार, या संभाव्य संघर्षामागे जम्मू-काश्मीरमध्ये वाढणाऱ्या दहशतवादी कारवाया हे प्रमुख कारण असू शकते.

2026 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता; अमेरिकन थिंक टँकचा धक्कादायक दावा
India-Pakistan : अमेरिकेतील नामांकित थिंक टँक Council on Foreign Relations (CFR) ने आपल्या ताज्या अहवालात धक्कादायक इशारा दिला आहे. 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तानात सशस्त्र संघर्ष किंवा थेट युद्ध होण्याची शक्यता CFR ने वर्तवली आहे. या संभाव्य संघर्षामागे जम्मू-काश्मीरमध्ये वाढणाऱ्या दहशतवादी कारवाया हे प्रमुख कारण असू शकते, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
अहवालात काय म्हटले आहे?
CFR चा Conflicts to Watch in 2026 हा अहवाल अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण तज्ज्ञांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे. या सर्वेक्षणात माजी राजनयिक, लष्करी अधिकारी, प्राध्यापक आणि धोरणात्मक विश्लेषक सहभागी आहेत. अहवालानुसार, भारत-पाकिस्तान संघर्ष केवळ दक्षिण आशियापुरता मर्यादित न राहता अमेरिकेच्या हितांवरही थेट परिणाम करू शकतो.
2025 मधील संघर्षाची पार्श्वभूमी
अहवालात 2025 मधील घटनांचा संदर्भ देण्यात आला आहे. पहलगाम (जम्मू–काश्मीर) येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला होता. या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई केली. भारतीय लष्कराच्या कारवाईत 100 हून अधिक दहशतवादी ठार, 9 दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त झाल्याचा दावा करण्यात आला होता.
त्यानंतर, 7 ते 10 मेदरम्यान पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे हल्ल्याचे प्रयत्न झाले, मात्र भारतीय संरक्षण यंत्रणांनी ते यशस्वीरीत्या हाणून पाडले. अखेर 10 मे रोजी दोन्ही देशांच्या DGMO स्तरावर चर्चा होऊन LoC वर शस्त्रसंधी लागू झाली.
2026 मध्ये पुन्हा संघर्ष का भडकू शकतो?
CFR च्या मते काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांची हालचाल वाढत आहे. काही अहवालांनुसार, राज्यात 30 पेक्षा जास्त दहशतवादी लपून बसलेले असू शकतात. अशा कारवायांना प्रत्युत्तर देताना भारत-पाकिस्तान संघर्ष पुन्हा उफाळण्याचा धोका आहे.
अमेरिकेची भूमिका आणि ट्रम्प प्रशासन
अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, Donald Trump प्रशासनाने भारत-पाकिस्तानसह अनेक आंतरराष्ट्रीय संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न केले होते. यात भारत-पाकिस्तान, गाझा पट्टी, युक्रेन-रशिया, काँगो आणि कंबोडिया-थायलंड या संघर्षांचा समावेश होता.
पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेलाही धोका
CFR अहवालात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला आहे. 2026 मध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातही सीमावर्ती संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑक्टोबरमध्ये अफगाण तालिबान आणि संलग्न दहशतवादी गटांनी पाकिस्तानी सीमा चौक्यांवर हल्ले केले. यामध्ये 200 पेक्षा जास्त तालिबानी व दहशतवादी ठार, तर 23 पाकिस्तानी सैनिक शहीद झाल्याची माहिती आहे.
TTP नेता नूर वली महसूद याला लक्ष्य करून पाकिस्तानने काबुल परिसरात हवाई हल्ले केल्याने तणाव आणखी वाढला. CFR च्या मते, हा संघर्ष अमेरिकेसाठी तुलनेने कमी धोका निर्माण करेल, मात्र दक्षिण आशियातील अस्थिरता वाढवणारा ठरू शकतो.