पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहे. त्यातच घाबरलेल्या पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक घेण्याची मागणी केली. त्या मागणीवरून UNSC ची बंद दाराआड बैठक झाली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत पाकिस्तान यांच्या तणावावर चर्चा करण्याचा पाकचा प्रयत्न होता. मात्र या बैठकीत ना कुठला निर्णय झाला, ना कुठला ठराव समंत करण्यात आला. त्याउलट संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या इतर सदस्यांनी जे कठीण सवाल उपस्थित केले त्यातून पाकिस्तानची बोलती बंद झाली.
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
पहलगाम हल्ल्यात लश्कर ए तोयबाचा हात आहे का असा सवाल पाकिस्तानला विचारण्यात आला. त्याशिवाय धर्म विचारून पर्यटकांना गोळी झाडली असंही काही सदस्यांनी म्हटलं. सूत्रांनुसार, UNSC च्या बैठकीत सदस्यांनी २२ एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्याचा निषेध करत त्याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. पर्यटकांना धर्माच्या आधारे टार्गेट करण्याचा मुद्दा उचलण्यात आला. अनेक सदस्यांनी पाकिस्तानकडून मिसाईल चाचणी आणि अणुहल्ल्याच्या धमकीनं तणाव वाढल्याची चिंता व्यक्त केली. पाकिस्तानला द्विपक्षीय पद्धतीनेच हा मुद्दा सोडवण्याचा सल्ला इतर सदस्यांनी दिला.
पाकिस्तानची झाली फजिती
पाकिस्तानला UNSC बैठकीकडून फार अपेक्षा होती. या बैठकीत खोटा बनाव सदस्य मान्य करतील असं पाकला वाटत होते. परंतु तसे काही झाले नाही. बंद खोलीत झालेल्या चर्चेनंतर सुरक्षा परिषदेकडून निवेदन जारी केले जाईल असंही पाकिस्तानला वाटत होते. परंतु तेही घडले नाही.यूएनएससीने कुठलेही निवेदन जारी न केल्याने पाकची फजिती झाली.
भारताच्या गैरहजेरीत पाकला अजेंडा चालवायचा होता
पाकिस्तान सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य आहे. भारत या सुरक्षा परिषदेचा भाग नाही. अशावेळी भारताच्या गैरहजेरीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आपला अजेंडा पुढे रेटता येईल असं पाकिस्तानला वाटत होते. परंतु भारताच्या रणनीतीनं इतर सदस्यांनी पाकिस्तानला बैठकीत घेरले. पाकिस्तानकडून होणाऱ्या चिथावणीखोर विधानांवरही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. भारताविरोधात खोटे आरोप आणि काश्मीर मुद्दा उचलण्यासाठी या बैठकीचा पाकिस्तानने वापर केला परंतु सुरक्षा परिषदेतील सदस्यांनी पाकिस्तानला अनेक सवाल विचारले. त्यामुळे बैठकीत काहीच निष्पन्न झाले नाही.