जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 10:58 IST2025-05-15T10:57:28+5:302025-05-15T10:58:07+5:30
What Happens In Nuclear Attack: जगात ९ देशांकडे न्यूक्लियर आहेत, त्यात संयुक्त राज्य अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, यूनाइटेड किंगडम, भारत, पाकिस्तान, इस्त्रायल आणि उत्तर कोरिया यांचा समावेश आहे

जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो?
नवी दिल्ली - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च करत पाकिस्तानात घुसून १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानी नेत्यांकडून भारताला न्यूक्लियर हल्ल्याच्या पोकळ धमक्या देण्यात येत होत्या. परंतु भारत न्यूक्लियर हल्ल्याची धमकी सहन करणार नाही अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. जर एखादा देश न्यूक्लियर हल्ला करण्याचा निर्णय घेत असेल तर ते सक्रीय करण्यापासून लॉन्च करण्यापर्यंत लागणारा वेळ यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. देशातील तांत्रिक क्षमता, कमांड अँन्ड कंट्रोल प्रणाली, भौगोलिक परिस्थिती याचाही विचार करावा लागतो.
भारत-पाकिस्तान युद्धावेळी किराणा हिल्स येथील हल्ल्यात रेडिएशन लीक झाल्याचा दावा सोशल मीडियावर फिरत आहे. भारत-पाकिस्तान दोन्ही देशात न्यूक्लियर बॉम्ब आहेत. जगात ९ देशांकडे न्यूक्लियर आहेत, त्यात अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, यूनाइटेड किंगडम, भारत, पाकिस्तान, इस्त्रायल आणि उत्तर कोरिया यांचा समावेश आहे. न्यूक्लियर हल्ला करण्यामागे एक पूर्ण प्रक्रिया करावी लागते. नेमकं ते काय आहे हे जाणून घेऊया...
निर्णय घेणे - न्यूक्लियर हल्ल्याचा निर्णय घेणे हा महत्त्वाचा टप्पा आहे. याठिकाणी देशातील सर्वोच्च नेतृत्व मग राष्ट्रपती, पंतप्रधान अथवा सैन्य प्रमुख असो, ते हल्लाचा आदेश देतात. हा निर्णय अतिशय सीक्रेट, धोक्याचा अंदाज आणि राजनैतिक पातळीवर आधारित असतो.
कमांड अँन्ड कंट्रोल - हा आदेश सैन्य कमांड सेंटरपर्यंत पोहचवला जातो. जिथून याला सुरुवात होते. त्यात टू मॅन रुल अथवा अन्य सुरक्षा प्रोटोकॉलचा समावेश असतो जेणेकरून चुकीचा उपयोग रोखला जाऊ शकतो.
शस्त्रांची तयारी - न्यूक्लियर लॉन्च करण्यासाठी तयार केले जाते, ज्यात मिसाईल सक्रीय करणे, टार्गेट सेट करणे आणि तांत्रिक गोष्टींचा समावेश असतो.
लॉन्च - शस्त्रे लॉन्च केले जातात, जी मिसाईल लढाऊ विमान अथवा पाणबुडीच्या माध्यमातून डागले जाऊ शकते.
अण्वस्त्रधारी देशात न्यूक्लियर वेपन एक्टिव करण्याची वेळ
अमेरिका - लॉन्चिंगच्या आदेशानंतर ४-५ मिनिटे
अमेरिकेजवळ जगातील सर्वात प्रगत कमांड अँन्ड कंट्रोल आहे. राष्ट्रपतींच्या आदेशानंतर काही मिनिटांत न्यूक्लियर लॉन्च केला जाऊ शकतो. पाणबुडीतून मिसाईल लॉन्च करायला १०-१५ मिनिटे लागू शकतात. अमेरिकेकडे जमीन, समुद्र, वायू आधारित न्यूक्लियर तैनात ठेवले जातात.
रशिया - ४-१० मिनिटे
रशियातील अण्वस्त्र प्रणाली अत्याधुनिक आहे. रशियाकडे डेड हँडसारखी प्रणाली आहे. जी सुनिश्चितपणे हल्ला करू शकते. रशियादेखील काही मिनिटांत न्यूक्लियर मिसाईल लॉन्च करू शकते. पाणबुडी आणि मोबाईल लॉन्चरला अधिक वेळ लागतो परंतु रशियाची रणनीती त्वरीत एक्शनवर केंद्रीत आहे. रशियाकडे जगातील सर्वात जास्त अण्वस्त्र साठा आहे.
चीन - १५-३० मिनिटे
चीनचं अण्वस्त्र धोरण नो फर्स्ट यूज आधारित आहे. त्यामुळे त्यांची शस्त्रे कायम तैनात नसतात. मिसाईल सक्रीय करणे आणि इंधन भरण्यासाठी वेळ लागतो. अलीकडच्या काळात चीनने त्यांच्या अण्वस्त्र क्षमतेचा विस्तार केला आहे. नव्या हायपरसोनिक मिसाईल वेगाने लॉन्च होऊ शकतात. चीनकडे जवळपास ३५०-४०० शस्त्रे आहेत.
भारत - ३० मिनिटापासून पुढे
भारताचे अण्वस्त्र धोरण नो फर्स्ट यूज आहे. भारताचे शस्त्र तैनात नाहीत. मिसाईल सक्रीय करणे आणि इतर गोष्टींसाठी वेळ लागू शकतो. अग्नी मिसाईल आणि पाणबुडीतून K4 मिसाईल लॉन्च करू शकतात. भारताची कमांड प्रणालीत सिविलियन आणि सैन्य नेतृत्व यांच्यात समन्वय आवश्यक आहे. ज्यामुळे वेळ वाढू शकतो. भारताकडे १७२ अण्वस्त्रे आहेत. ज्यातील बहुतांश जमीन आणि समुद्रात आधारित आहे.
पाकिस्तान - ३० मिनिटापासून पुढे
पाकिस्तानचं अण्वस्त्र धोरण भारतावर केंद्रीत आहे. त्यावर त्वरीत प्रतिक्रियेची क्षमता आहे. गौरी, शाहीन मिसाईल सक्रीय करण्यात वेळ लागू शकतो. सैन्य नेतृत्व केंद्रीत असल्याने प्रक्रिया मंदावू शकते. पाकिस्तानकडे जवळपास १७० अण्वस्त्रे आहेत, जी मुख्यत: जमिनीवर आहेत.