भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 16:12 IST2025-06-25T16:10:37+5:302025-06-25T16:12:35+5:30

India-Pakistan Relation : भारताशी दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तान तयार झाला आहे.

India-Pakistan Relation: 'We are ready to resolve the issues of PoK and terrorism', Pakistan requests 'saudi Arabia' for mediation | भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती

भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती

India-Pakistan Relation : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध विकोपाला गेले आहेत. भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाक सरकारने भारत सरकारसोबत संबंध सुधारण्याचे बरेच प्रयत्न केले, मात्र यापुढे दहशतवादाच्या मुद्द्यावरच चर्चा होणार, असा पवित्रा भारताने घेतला आहे. अशातच आता, पाकिस्तानातील शेहबाज सरकारने सौदी अरेबियाकडे मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे.

सौदी अरेबियाकडे मागितील मदत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ हे भारताशी चर्चा करुन दहशतवाद, पाकव्याप्त काश्मीर आणि द्विपक्षीय व्यापाराचे प्रश्न सोडवू इच्छितात. यासाठी त्यांनी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अब्दुलअजीज अल सौद यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनी ARY न्यूजनुसार, शाहबाज शरीफ यांनी मोहम्मद बिन सलमान यांच्याशी फोनवर चर्चा केली, या दरम्यान त्यांनी POK, सिंधू पाणी करार, व्यापार आणि दहशतवाद यावर भारताशी बोलण्यास तयार असल्याचे सांगितले.

पाकिस्तानबाबत भारताची भूमिका
२२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली होती, ज्यामध्ये पाकिस्तानी नागरिकांना हाकालून देणे, अटारी वाघा सीमा बंद करणे, पाकिस्तानींची व्हिसा सवलत थांबवणे, पाकिस्तान उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे, सिंधू पाणी करार स्थगित करणे. भारताची भूमिका स्पष्ट आहे की, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद आणि POK चा प्रश्न सोडवत नाही, तोपर्यंत त्यांच्यासोबत इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा केली जाणार नाही.

'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार

पाकिस्तानने भारतावर दबाव आणण्यासाठी ओआयसीमधील ५७ मुस्लिम देशांसमोर सिंधू पाणी कराराचा मुद्दा उपस्थित केला, मात्र त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. कोणत्याही देशाने पाकिस्तानच्या मागणीला गांभीर्याने घेतले नाही. अशा परिस्थितीत आता पाकिस्तानने सौदी अरेबियाकडे मदतीची याचना केली आहे. याव अद्याप भारत सरकारकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

काय आहे सिंधू पाणी करार?
६५ वर्षांपूर्वी १९६० मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू नदीच्या पाण्याच्या वाटपावर एक करार झाला होता. या करारानुसार, पश्चिमेकडील नद्यांच्या - सिंधू, झेलम आणि चिनाबच्या पाण्यावर पाकिस्तानचा अधिकार आला, तर पूर्वेकडील नद्यांच्या - रावी, बियास आणि सतलजच्या पाण्यावर भारताचा अधिकार आहे. अशा प्रकारे, भारताला २० टक्के पाणी मिळाले, तर पाकिस्तानला ८० टक्के पाणी मिळाले. पाकिस्तानातील सुमारे साठ टक्के शेती याच सिंधू खोऱ्यातील पाण्यावर अवलंबुन आहे.

Web Title: India-Pakistan Relation: 'We are ready to resolve the issues of PoK and terrorism', Pakistan requests 'saudi Arabia' for mediation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.