India Pakistan Ceasefire, Indus Water Treaty: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला लष्करी संघर्ष अखेर थांबवण्याचा निर्णय सहमतीने घेण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या DGMO यांनी एकमेकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी याबाबत सांगितले की, पाकिस्तानच्या मिलिटरी ऑपरेशन्सचे महासंचालक (DGMO) यांनी भारताच्या DGMO यांच्याशी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी फोन करून संवाद साधला. या दोघांमधील संवादात सहमतीने असे ठरवण्यात आले की एकमेकांच्या जमीनीवर, हवाई क्षेत्रात आणि सागरी क्षेत्रात दोन्ही बाजूने होत असलेला गोळीबार आणि लष्करी कारवाया या आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून थांबवण्यात येतील. याबाबत दोन्ही देशांच्या संबंधित विभागांना आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. दोन्ही देशांचे DGMO १२ मे रोजी १२:०० वाजता एकमेकांशी फोनवरून पुन्हा संवाद साधणार आहेत, असेही सांगण्यात आले. अशा परिस्थितीत सिंधू जल कराराबाबत काय निर्णय घेतला जाणार ते जाणून घेऊया.
भारत पुन्हा पाकिस्तानला पाणी देणार?
सिंधू जलवाटप करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील समझोता होता. आता संघर्ष थांबवण्याची घोषणा झाल्यामुळे, भारताकडून पुन्हा पाकिस्तानला पाणी दिले जाणार का, असा सवाल विचारला जात आहे. यावर काही जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधू जल करार हा भारताने लष्करी हल्ल्यांच्या आधीच निलंबित केला होता. भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधीला सहमती दर्शवली आहे. याचा अर्थ दोन्ही बाजूने होणारे हल्ले किंवा लष्करी कारवाया हे पूर्णपणे बंद करण्यात येतील असा त्याचा अर्थ आहे. भारताने त्याआधी जे निर्णय घेतलेत, त्याबद्दल कुठलीही चर्चा झालेली नाही.
जलवाटप करारावरून आधीच पाकिस्तानला दोन वेळा नोटीस
सिंधू जलवाटप करार निलंबित करण्यात आला आहे त्याच्याबद्दल पुढचा निर्णय घेण्याबद्दल कुठलीही चर्चा करण्यात आलेली नाहीये. हा लष्करी संघर्ष सुरू होण्यापूर्वीच भारताने सिंधू जल कराराला स्थगिती दिली होती. या करार मुळातच पक्षपाती स्वरूपाचा असून भारताने गेल्या दोन वर्षात या करारात फेरबदलाची गरज असल्याचे पाकिस्तानला दोन वेळा सांगितले आहे. पण पाकिस्तानकडून काहीही उत्तर आलेले नाही. या जलकरारात अनेक त्रुटी आहेत. पाकिस्तानला ७० टक्के आणि भारताला ३० टक्के पाणी असे त्याचे वाटप आहे. तसेच, या कराराला डेडलाईन नाही, बाहेर येण्याचा मार्ग नाही. त्यामुळे या कराराबद्दल फेरविचार व्हायला हवा असे भारताने पाकिस्तानला सातत्याने सांगितले आहे. त्यामुळे सध्याच्या क्षणाला झालेला युद्धविराम हा केवळ लष्करी कारवाया आणि हल्ले थांबवण्यासाठी करण्यात आला आहे. सिंधू जलवाटप करार अद्यापही निलंबितच असणार आहे.