India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 17:56 IST2025-05-10T17:56:20+5:302025-05-10T17:56:20+5:30
India Pakistan Ceasefire: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या लष्करी संघर्षाबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
Ceasefire in India Pakistan: मागील तीन-चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. दोन्ही देशातील लष्करी थांबावा आणि तणाव निवळावा यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर दोन्ही देशांनी तात्कळ शस्त्रसंधी करण्यासाठी तयार दर्शवली आहे. याबद्दलची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मागील दोन दिवसांपासून चांगलाच चिघळला होता. पाकिस्तानकडून रात्रीच्या वेळी भारतातील लष्करी आणि नागरी ठिकाणांवर हल्ले करण्यात आल्यानंतर भारताकडून प्रत्युत्तर दिले गेले. हा संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला होता. दोन्ही देशातील तणाव कमी व्हावा यासाठी प्रयत्न सुरु झाले होते. अखेर अमेरिकेच्या मध्यस्थीने हा संघर्ष थांबल्याचे जाहीर करण्यात आले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चर्चेनंतर अखेर मला ही घोषणा करताना आनंद होत आहे की, भारत आणि पाकिस्तान हे दोघेही पूर्णपणे आणि तात्काळ शस्त्रसंधी करण्यास तयार झाले आहेत. सारासार विचार आणि विद्वत्तेचा वापर केल्याबद्दल दोन्ही देशांचे अभिनंदन", अशी घोषणा ट्रम्प यांनी केली.
I am pleased to announce that India and Pakistan have agreed to a full and immediate ceasefire, said US President Donald Trump: Reuters reported pic.twitter.com/PcjBojJGqk
— ANI (@ANI) May 10, 2025
कधीपासून हल्ले रोखण्यावर झाले एकमत?
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी याबद्दल अधिक माहिती दिली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "पाकिस्तानचे लष्करी मोहीम महासंचालक (डीजीएमओ) आणि भारताचे लष्करी मोहीम संचालक (डीजीएमओ) यांच्यात आज (१० मे) दुपारी ३.३५ मिनिटांनी चर्चा झाली."
"दोन्ही देशांकडून जमिनीवरून, हवेतून आणि समुद्रातून होणार हल्ले भारतीय प्रमाणवेळेनुसार ५ वाजेपासून (१० मे रोजीपासून) तात्काळ थांबवण्यावर एकमत झाले. याची अमलबजावणी करण्याचे दोन्ही बाजूंना सांगण्यात आले आहे. दोन्ही देशांचे डीजीएमओ यांच्या १२ मे रोजी पुन्हा दुपारी १२ वाजता चर्चा होणार आहे", असे मिस्त्री यांनी सांगितले.
पाकिस्तानचे उपपंतप्रधान डार काय म्हणाले?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान तत्काळ शस्त्रीसंधी लागू करण्यास तयार झाल्याची घोषणा केली. त्यानंतर पाकिस्तानचे उप पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनीही याला दुजोरा दिला.
"पाकिस्तान आणि भारत तात्काळ शस्त्रसंधी करण्यास तयार तयार झाले आहेत. पाकिस्ताने सार्वभौमत्व आणि अखंडतेशी तडजोड न करता प्रदेशात शांतता आणि सुरक्षा राहावी यासाठीच प्रयत्न केले आहेत", असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांनी सांगितले.