शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 00:44 IST2025-05-14T00:42:30+5:302025-05-14T00:44:21+5:30

Indian Reaction On Bangladesh Decision: बांगलादेशच्या मोहम्मद युनूस सरकारने घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत भारताने भूमिका स्पष्ट केली.

india mea spokesperson randhir jaiswal says the ban on the awami league in bangladesh without due process is a concerning development | शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

Indian Reaction On Bangladesh Decision: अलीकडेच बांगलादेशमधील मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने एक मोठा निर्णय घेतला. माजी पदच्चुत पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगवर देशाच्या दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत बंदी घालण्यात आली. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने घेतलेल्या या निर्णयावर भारताने नाराजी व्यक्त करत भूमिका स्पष्ट केली.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी रणधीर जयस्वाल यांना बांगलादेशमधील अंतरिम सरकारने अवामी लीग पक्षावर घातलेल्या बंदीबाबत प्रश्न विचारला. यावर बोलताना रणधीर जयस्वाल म्हणाले की, योग्य प्रक्रिया राबल्याशिवाय अवामी लीग पक्षावर घालण्यात आलेली बंदी आणि यासंदर्भातील घटनाक्रम चिंताजनक आहे. 

निवडणुका लवकर घेण्यास आम्ही पाठिंबा देतो

लोकशाही देश म्हणून भारताला लोकशाहीचे स्वातंत्र्य आणि राजकीय परीघावरील येत असलेली गदा याबद्दल स्वाभाविकपणे चिंता आहे. बांगलादेशात मुक्त, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक निवडणुका लवकर घेण्यास आम्ही पाठिंबा देतो, असेही रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत ‘अवामी लीग’वर बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा केली. एका निवेदनात असे म्हटले आहे की, देशाची सुरक्षितता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याच्या हितासाठी बांगलादेश आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात अवामी लीग आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध खटला पूर्ण होईपर्यंत ही बंदी लागू राहील.

दरम्यान, गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांना बांगलादेश सोडून दुसऱ्या देशात पलायन करावे लागले होते. त्यानंतर पुढच्या काही दिवसांतच बांगलादेशात नोबेल पारितोषिक विजेते युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झाले. तेव्हापासून शेख हसीना आणि अवामी लीगच्या डझनभर नेत्यांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

 

Web Title: india mea spokesperson randhir jaiswal says the ban on the awami league in bangladesh without due process is a concerning development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.