'भारत कठीण परिस्थितीत आहे', इराण युद्धादरम्यान अमेरिकेच्या भू-राजकीय तज्ज्ञाने दिला सावधगिरीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 16:32 IST2026-03-12T16:30:31+5:302026-03-12T16:32:54+5:30

युद्धामुळे भारतासमोर एकाच वेळी इस्रायल आणि इराणसोबत असलेल्या संबंधामध्ये समतोल साधणे आव्हानात्मक बनले आहे. याच मुद्द्यावरून अमेरिकेतील भू-राजकीय तज्ज्ञाने भारताला सावधगिरीचा इशारा दिला आहे. 

'India is in a difficult situation', US geopolitical expert warns amid Iran war | 'भारत कठीण परिस्थितीत आहे', इराण युद्धादरम्यान अमेरिकेच्या भू-राजकीय तज्ज्ञाने दिला सावधगिरीचा इशारा

'भारत कठीण परिस्थितीत आहे', इराण युद्धादरम्यान अमेरिकेच्या भू-राजकीय तज्ज्ञाने दिला सावधगिरीचा इशारा

इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धामुळे मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. या युद्धाचे परिणाम पश्चिम आशियातही याचे पडसाद उमटू लागले आहेत. भारतासमोर भू-राजकीय समतोल राखणे आव्हानात्मक होऊ लागले असून, भू-राजकीय तज्ज्ञ आणि लेख मायकल कुगेलमॅनने इंडिया टुडेशी बोलताना याबद्दल भाष्य केले आहे. भारताने ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने सावधगिरीने पावले उचलायला हवीत, असे त्यांनी म्हटले आहे. 

"नवी दिल्लीने (भारताने) आपल्या राजनैतिक अधिकारांचे रक्षण करायला हवे. आपली महत्त्वाच्या देशांशी भागीदारी कायम ठेवली पाहिजे. ऊर्जा सुरक्षेच्या सुरक्षेसाठी सावध पावले उचलायला हवीत", असे कुगेलमॅन यांनी म्हटले आहे. 

मायकल कुगेलमॅन हे दक्षिण आशियाचा अभ्यास असणारे अमेरिकेतील एक प्रमुख अभ्यासक आहेत. ते वॉशिंग्टन डीसीमध्ये असलेल्या अटलांटिक काऊन्सिलमध्ये दक्षिण आशियासाठी वरिष्ठ संशोधक आहेत. 

कुगेलमॅन यांनी म्हटले आहे की, भारत कठीण परिस्थितीमध्ये आहे. कारण या भू-राजकीय खेळामध्ये भारताचे अनेक देशांसोबत खूप जवळचे संबंध आहेत. ज्यात काही देश एकमेकांचे शत्रूही आहेत. त्यामुळे युद्धाचा थेट परिणाम होत आहे. 

"भारत अवघड परिस्थिती आहे. कारण आम्ही बघतोय की, मागील काही वर्षांमध्ये इस्रायलसोबत भारताचे संबंध किती गरजेचे बनले आहेत", असे कुगेलमॅन यांनी म्हटले आहे. 

भारत-इराण संबंध 

भारताचे गेल्या अनेक वर्षांपासून इराणसोबत मजबूत संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि ऊर्जा क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रात आयात-निर्यात होत राहिली आहे. भारताने इराणमध्ये चाबहार पोर्ट विकसित करण्यासाठीही निधी दिला आहे. 

मात्र, युद्ध सुरू झाल्यापासून भारताकडून सावध पावले टाकली जात आहेत. भारताने जाहीरपणे अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूबद्दल भूमिका घेणं टाळले. त्यावरूनही सरकारवर विरोधकांकडून टीका झाली आहे. 

आतापर्यंत जहाजावर किती हल्ले?

ब्रिटन मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्सच्या माहितीनुसार, अमेरिका-इस्रायलचे इराणसोबत युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत १६ हल्ले जहाजांवर झाले आहेत. २८ फेब्रुवारी रोजी या युद्धाला तोंड फुटले होते. तेव्हापासून होर्मुझ सामुद्रधुनी आणि ओमानच्या खाडीत अनेक जहाजांवर हल्ले करण्यात आले. 

Web Title: 'India is in a difficult situation', US geopolitical expert warns amid Iran war