भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 15:44 IST2025-07-16T15:43:50+5:302025-07-16T15:44:25+5:30
Philippines News: आशिया खंडामध्ये अनेक देशांचा शेजार लाभलेल्या चीनचे आपल्या एकाही शेजारील देशासोबत चांगले संबंध नाहीत. चीनच्या आक्रमक सीमावादामुळे चीनच्या शेजारी असलेला प्रत्येक देश त्रस्त आहे. चीनच्या याच आक्रमकतेला वैतागलेल्या फिलिपिन्सचे आता उघडपणे आपल्या धोरणात बदल करण्यास सुरुवात केली आहे.

भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
आशिया खंडामध्ये अनेक देशांचा शेजार लाभलेल्या चीनचे आपल्या एकाही शेजारील देशासोबत चांगले संबंध नाहीत. चीनच्या आक्रमक सीमावादामुळे चीनच्या शेजारी असलेला प्रत्येक देश त्रस्त आहे. चीनच्या याच आक्रमकतेला वैतागलेल्या फिलिपिन्सचे आता उघडपणे आपल्या धोरणात बदल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच फिलिपिन्सने आता असं पाऊल उचललं आहे ज्यामुळे चीनची डोकेदुखी वाढली आहे. फिलिपिन्सने भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची खरेदी केली आहे. त्यानंतर चीनचा कट्टर वैरी असलेल्या तैवानसोबत आपले लष्करी संबंध दृढ केले आहेत. तसेच जपानकडून युद्धनौका खरेदी करून आपल्या नौदलाला भक्कम केलं आहे.
फिलिपिन्स आणि चीनमध्ये बऱ्याच वर्षांपासून सागरी सीमेवरून वाद सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर फिलिपिन्सने चीनच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी तैवानसोबत मैत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. फिलिपिन्सचे संरक्षणमंत्री गिल्बर्ट टियोडोरो यांनी सांगितले की, ‘तैवानच्या सुरक्षेचा आमच्यावर काही काही परिणाम होणार नाही असं म्हणणं ही स्वत:चीच फसवणूक ठरेल’. टियोडिरो यांच्या या विधानामुळे फिलिपिन्स तैवानबाबतच्या आपल्या भूमिकेमध्ये बदल करत असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र चीनच्या वन चायना पॉलिसीनुसार फिलिपिन्स अजूनही चीनलाच पाठिंबा देत आहे.
दरम्यान, तायपै टाइम्समधील वृत्तानुसार फिलिपिन्सकडून तैवानसोबतचं संरक्षण सहकार्य सार्वजनिकरीत्या दर्शवण्यात येत असलेल्या पातळीपासून खूप पुढे गेलेलं आहे. राष्ट्रपती फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांच्या नव्या धोरणांनुसार तैवानसोबतच्या लष्करी आणि अकादमिक संबंधांवर लावण्यात आलेले जुने निर्बंध शिथिल केले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला फिलिपिन्सच्या संरक्षण संस्थांशी संबधित असलेल्या तज्ज्ञांनी तैवानच्या वरिष्ठ जनरल्ससोबतच्या रणनीतिक विचारविनिमयामध्ये सहभाग घेतला होता. त्याशिवाय फिलिपिन्स आणि तैवानच्या कोस्ट गार्डने संयुक्त गस्तही घातली होती. हल्लीच तैवानने अमेरिका, जपान आणि फिलिपिन्सच्या त्रिपक्षीय लष्करी सरावामध्ये आपल्या निरीक्षकांना पाठवले होते. ही रणनीती चीनकडून समुद्रामध्ये होत असलेल्या आक्रमक कारवायांना दिलेलं प्रत्युत्तर होती, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. दरम्यान, जपान फिलिपिन्सला सहा जहाजं देणार आहे. याबरोबरच अबुकुमा श्रेणीमधील एक युद्धनौका जपान फिलिपिन्सला देण्याच्या तयारीत आहे.