तालिबानशी व्यावहारिक संवाद गरजेचा; भारताचे संयुक्त राष्ट्रांना आवाहन, पाकिस्तानवर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:01 IST2025-12-11T13:00:11+5:302025-12-11T13:01:08+5:30
भारताने लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, ISIS, अल-कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनांवर कडक कारवाईची मागणी करावी.

तालिबानशी व्यावहारिक संवाद गरजेचा; भारताचे संयुक्त राष्ट्रांना आवाहन, पाकिस्तानवर साधला निशाणा
न्यूयॉर्क : अफगानिस्तानातील जनतेचे जीवन सुकर करण्याची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित करत, भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तालिबानसोबतचे व्यावहारिक संबंध सुधारण्याची आवश्यकता अधोरेखित केली. भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत परवथनेनी हरीश यांनी स्पष्ट केले की, भारत तालिबानशी व्यावहारिक सहभागाचे आवाहन करतो. फक्त कारवाई केंद्रित दृष्टिकोन योग्य नाही. सातत्यपूर्ण धोरणाने सकारात्मक पावले उचलण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे.
अफगाणी जनतेच्या विकासात्मक गरजा पूर्ण करणे, ही आपली बांधिलकी आहे. काबुलमधील भारतीय टेक्निकल मिशनचे दूतावासात पुनःस्थापन करण्याचा निर्णय ही त्याच वचनबद्धतेचे प्रमाण आहे. अफगाणिस्तानच्या जनतेचा प्राधान्यक्रम आणि आकांक्षांच्या अनुषंगाने सर्वांगीण विकास, मानवतावादी मदत आणि क्षमता बांधणीमध्ये आपले योगदान वाढविण्यासाठी आम्ही सर्व भागधारकांशी संपर्क साधत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारत-अफगाणिस्थानचे वाढते संबंध...
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी ऑक्टोबरमध्ये सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. 2021 मध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर ते भारताला भेट देणारे सर्वात वरिष्ठ आणि बहुदा पहिलेच तालिबानी मंत्री होते. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मुत्ताकी यांच्याशी व्यापक चर्चा केली आणि काबूलमधील तांत्रिक मिशनचे दूतावासात रुपांतर करण्याची आणि अफगाणिस्तानमधील विकासकाम पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली.
पाकिस्तानवर अप्रत्यक्ष निशाणा
राजदूत हरीश यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्याच्याकडून चालू असलेल्या दहशतवादी पोसणाऱ्या धोरणांवर टीका केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले की, लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, तसेच ISIS, अल-कायदा यांसारख्या संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या सर्व दहशतवादी संघटनांच्या क्रियाकलापांवर कडक कारवाई करावी.
पाकिस्तानी हवाई हल्ल्यांवर भारताची तीव्र निंदा
भारताने UNAMAने व्यक्त केलेल्या चिंतेचे समर्थन करत, पाकिस्तानच्या अफगाणिस्तानवरील हवाई हल्ल्यांना तीव्र शब्दांत विरोध केला. या हल्ल्यांत महिला, मुले आणि खेळाडूंचा मृत्यू झाल्याचे सांगत हरीश म्हणाले की, देशाच्या व्यापार मार्गांना अडथळा आणणे, हा WTO नियमांचा भंग आहे आणि अशा कृती संयुक्त राष्ट्र चार्टर व आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहेत. भारताने अफगानिस्तानच्या भौगोलिक अखंडता, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याचे समर्थन पुन्हा स्पष्ट केले.
अफगाणिस्तानात भारताचे 500 हून अधिक विकास प्रकल्प
भारताने आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण, क्षमता निर्माण आणि क्रीडा क्षेत्रात अफगाणिस्तानात 500 पेक्षा जास्त प्रकल्प पूर्ण केले आहेत. अफगाणी उद्योग-वाणिज्य मंत्री नूरुद्दीन अज़िजी यांच्या अलीकडील भारत दौर्यामुळे व्यापार, कनेक्टिव्हिटी आणि बाजार प्रवेशात सहकार्य आणखी वाढल्याचे भारताने सांगितले.