Imran Khan: इम्रान खानच्या अडचणीत वाढ; परदेशातून मिळालेल्या मौल्यवान भेटवस्तू विकून पैसे कमावल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 20:48 IST2022-08-08T20:47:40+5:302022-08-08T20:48:12+5:30
Imran Khan summoned: इम्रान खान यांना नोटीस जारी केली असून, 18 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

Imran Khan: इम्रान खानच्या अडचणीत वाढ; परदेशातून मिळालेल्या मौल्यवान भेटवस्तू विकून पैसे कमावल्याचा आरोप
Imran Khav Toshkhana controversy: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला आहे, मात्र पद सोडल्यानंतरही त्यांचा त्रास कमी झालेला नाही. आता इम्रान यांच्यावर पाकिस्तानच्या तोशाखान्यातून परदेशी पाहुण्यांकडून मिळालेल्या भेटवस्तू लाटल्याचा आरोप लागला आहे. पंतप्रधानांना भेट म्हणून मिळालेली आलिशान घड्याळे विकून कोट्यवधी रुपये कमावल्याचा आरोप इम्रानवर आहे. आता या संदर्भात इम्रान खान यांना नोटीस बजावण्यात आली असून 18 ऑगस्टला चौकशीसाठी बोलावले आहे.
जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, इम्रान खान यांच्यावर तोशाखान्यातून मौल्यवान भेटवस्तू घेतल्याचा आरोप झाल्यानंतर पाकिस्तानच्या निवडणूक आयोगात याचिका दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधानपद सोडताना इम्रान यांनी भेटवस्तुचे पैसे न देता या वस्तू सोबत नेल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (PDM) ने दाखल केलेल्या याचिकेत हा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता इम्रान यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
लक्झरी घड्याळे आणि भेटवस्तू विकल्या
एप्रिलमध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही इम्रानवर तोशाखान्यातील भेटवस्तू विकल्याचा आरोप केला होता. इम्रानवर दुबईत ज्वेलरी सेट ब्रेसलेट, मनगटी घड्याळे विकून 14 कोटी रुपये कमावल्याचा आरोप आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज नेते मोहसीन शाहनवाज यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तोशाखान्यातून घेतलेल्या भेटवस्तूची माहिती न दिल्याने इम्रान खान यांना पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमधून अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे.
काय सांगतो पाकिस्तानी कायदा?
पाकिस्तानच्या कायद्यानुसार, विदेशी व्यक्तींकडून मिळालेली कोणतीही भेट सरकारी तोशाखान्यात ठेवली जाते. जर राष्ट्रप्रमुखाला या भेटवस्तू आपल्याजवळ ठेवायच्या असतील तर त्यांना त्याची किंमत मोजावी लागते. गिफ्टची किंमत लिलावाद्वारे ठरवली जाते. कायद्यानुसार या मौल्यवान भेटवस्तू तोषखान्यात साठवल्या जातात किंवा त्यांचा लिलाव केला जातो. यातून मिळणारा पैसा राष्ट्रीय तिजोरीत जमा करावा लागतो.