इमरान, जेमिमा गोल्डस्मिथ आणि इलॉन मस्क; 'ग्रोक' टूलद्वारे जेमिमांनी उघड केली एक्सची 'शॅडो बंदी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 08:54 IST2025-12-17T08:48:58+5:302025-12-17T08:54:07+5:30
पाकिस्तानात पाकिस्तानी नसलेल्यांना जगणं किती अवघड असतं या विषयावर त्या सार्वजनिक पातळीवर अनेकदा नीडरपणे बोलल्या.

इमरान, जेमिमा गोल्डस्मिथ आणि इलॉन मस्क; 'ग्रोक' टूलद्वारे जेमिमांनी उघड केली एक्सची 'शॅडो बंदी'
इमरान खान यांनी केलेल्या प्रत्येक विवाहाची चर्चा झाली. पण सर्वात जास्त चर्चा झाली ती जेमिमा गोल्डस्मिथ यांच्यासोबत केलेल्या विवाहाची. ब्रिटिश टेलिव्हिजनवरील लेखक आणि निर्माता असलेल्या जेमिमा यांनी वयाच्या २१ व्या वर्षी आपल्यापेक्षा २० वर्षानी मोठ्या असलेल्या इमरान यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर त्या पाकिस्तानात आल्या. तेथील माध्यमांनी जेमिमा यांच्यावर भरपूर टीका केली. सांस्कृतिक भेदामुळे जेव्हा नात्यामध्ये जुळवून घेणं अगदीच अशक्य झालं तेव्हा २००४ मध्ये इमरान आणि जेमिमा यांचा घटस्फोट झाला.
घटस्फोटानंतर त्या पुन्हा आपल्या दोन मुलांसोबत इंग्लंडमध्ये परतल्या. पाकिस्तानात पाकिस्तानी नसलेल्यांना जगणं किती अवघड असतं या विषयावर त्या सार्वजनिक पातळीवर अनेकदा नीडरपणे बोलल्या. जेमिमा यांचा हाच नीडरपणा राजकीय कैदेत असलेल्या इमरान खान यांच्यासाठी पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. आता तर त्यांनी थेट इलॉन मस्क यांनाच त्यांनी दिलेल्या वचनाला जागण्याचं आवाहन केलं आहे.
२०२२ मध्ये इमरान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले. त्यांना राजकीय कैदी बनवून एकांतवासात टाकण्यात आलं. तेव्हापासून इमरान यांच्याबद्दलची कोणतीही माहिती त्यांच्या नातेवाइकांना, समर्थकांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना देण्यात आलेली नाही. जेमिमा आणि इमरान यांना दोन मुलं आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून मुलांना आपल्या वडिलांना भेटायचं आणि पाहायचं आहे; पण त्यांना ते शक्य होत नाहीये. जेमिमा यांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या पतीसाठी समाजमाध्यमांचा आधार घेतला. 'एक्स'वर इमरान यांना तुरुंगात न्याय्य वागणूक आणि मानवी हक्क
मिळण्यासाठी पोस्ट्स लिहिल्या. कालांतराने त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा आवाज जगभरात जाऊ द्या, खुद्द पाकिस्तानातही पोहोचत नाहीये. 'एक्स'वर जेमिमा यांच्या इमरान यांच्यावरील पोस्टचा 'रिच' मर्यादित करून टाकला आहे. एक्सवरील या छुप्या मुस्कटदाबीमुळे जेमिमा यांनी इलॉन मस्क यांना थेट सार्वजनिरीत्या आवाहन केलं आहे.
त्यात त्यांनी म्हटलं आहे, 'इलॉन मस्क, मी जेमिमा खान, इमरान खान यांची पूर्वाश्रमीची पत्नी. आपण एकमेकांना भेटलोही आहोत. ट्रिटर ताब्यात घेताना तुम्ही एक्सवर लोकांचं बोलण्याचं, अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य जपले जाईल असं म्हणाला होतात. किमान त्या वचनाची तरी आठवण ठेवा आणि एक्सवरील माझ्या पोस्टचा रिच मर्यादित करण्याची जी मुस्कटदाबी सुरू आहे ती थांबवा'!
जेमिमा यांनी केवळ भावनेच्या भरात हे आवाहन केलेलं नाही. त्यासाठी त्यांनी एक्सचे एआय टूल 'ग्रोक'द्वारे मिळवलेली याबाबतची तपशीलवार आकडेवारीच मस्क यांना सादर केली आहे. २०२३-२४ मध्ये जेमिमा यांच्या पोस्टचा रिच ४०० ते ९०० मिलियन होता. पण जेव्हापासून त्यांनी इमरान यांच्या न्याय्य हक्कांबद्दल पोस्ट्स टाकायला सुरुवात केली तेव्हापासून त्यांच्या पोस्टचा रिच २८. ६ मिलियन इतका घसरला। त्यांचे ९७ टक्के फॉलोअर्स कमी झाले.
आपल्या दुसऱ्या एका पोस्टमधून जेमिमा यांनी 'एक्स'सारखी मुक्त अभिव्यक्तीची जागा जिवंत राहायला हवी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. जेमिमा यांची ही आशा जिवंत राहील किंवा नाही, याचं उत्तर येणारा काळच देणार आहे.