कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 07:52 IST2025-12-16T07:52:04+5:302025-12-16T07:52:53+5:30
चार तरुण विदेशी कपडे घालून रस्त्यावर फिरताहेत, शिवाय त्यांनी त्याचा व्हिडीओ बनवून तोही सोशल मीडियावर टाकलाय हे कळल्याबरोबर त्यांना ताब्यात घेण्यात आलं!

कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
कोट, पँट, हॅट घालून, थोडा परफ्युम लावून चार तरुण रस्त्यावर फिरताहेत. छानच दिसताहेत ते. त्यांच्या मित्रमंडळींनीही त्यांचं याबद्दल कौतुक केलं. तुम्ही कसे 'हिरो' सारखे दिसताहेत म्हणून त्यांची प्रशंसा केली, त्यामुळे या चारही तरुणांनी त्यांचा एक व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर टाकला. शिवाय 'लाटसाहेब' बनून रस्त्यावरही ते फिरले.
पण, पोलिसांनी या चारही तरुणांना हटकले आणि त्यांना अटक केली आता त्यांची चूक काय? खरं तर त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नव्हता.. पण त्यांचा दोष एकच होता, तो म्हणजे ते अफगाणिस्तानात राहणारे आहेत आणि तालिबान्यांच्या दृष्टीनं विदेशी पेहराव करणं म्हणजे विदेशी संस्कृतीला चालना देणं आणि त्यांचे गुणगान गाणं! त्यामुळे चार तरुण विदेशी कपडे घालून रस्त्यावर फिरताहेत, शिवाय त्यांनी त्याचा व्हिडीओ बनवून तोही सोशल मीडियावर टाकलाय हे कळल्याबरोबर त्यांना ताब्यात घेण्यात आलं! या चारही तरुणांनी ब्रिटनची प्रसिद्ध टेलिव्हिजन सिरीज 'पीकी ब्लाइंडर्स' नुकतीच पाहिली होती. त्यातूनच त्यांनी प्रेरणा घेतली आणि तसाच पोशाख करून ते रस्त्यावरून फिरत होते। पण तालिबान्यांच्या मते ते विदेशी संस्कृतीला प्रोत्साहन देत होते. खरं तर अफगाणिस्तानमध्ये कोट, पेंट, हॅट घालू नये, असा काही नियम, कायदा नाही, पण तालिबान्यांच्या मते असं काही करणं म्हणजे गुन्हाच आहे. तालिबानी अधिकाऱ्यांनी या चौघा अफगाणी तरुणांवर विदेशी संस्कृतीचा प्रसार करण्याचा आरोप लावला आणि त्यांना ताब्यात घेतलं. या तरुणांची नावं असगर हुसैनाई, जलील याकूबी, अशोर अकबरी आणि दाऊद रसा अशी आहेत. चारही तरुणांचं वय साधारण विशीच्या आसपास आहे.
'सदाचार प्रसार आणि दुराचार प्रतिबंध' या 'नैतिक' कायद्याअंतर्गत अफगाणिस्तानात सामाजिक व व्यक्तिगत वर्तनांवर नियंत्रण ठेवलं जातं. ज्यात स्त्री-पुरुषांचे कपडे, वर्तन आणि पाश्चात्य किंवा परकीय संस्कृतीचं प्रदर्शन यांचा समावेश आहे. या कायद्यात लेखी शिक्षेचा उल्लेख नसला, तरी अफगाणिस्तानात स्वयंघोषित संस्कृतीरक्षक तालिबानी लोकांना ताब्यात घेणं, त्यांना जाहीर चाबकाचे फटकारे ओढणं अशा शिक्षा देतात. महिलांच्या कपड्यांबाबत तर तालिबानी अतिशय दक्ष आहेत।
तालिबानी मंत्रालयाचे प्रवक्ते सैफ-उर-इस्लाम खैबर यांच्या म्हणण्यानुसार तालिबान कोणतीही पाश्चिमात्य, आधुनिक किंवा माध्यमांमधून प्रेरित गोष्ट अनुचित मानतो. इथल्या धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांचं पालन प्रत्येकाला करावंच लागेल. तथापि, त्यांच्या म्हणण्यानुसार या चौघाही तरुणांना 'समज' देऊन सोडून देण्यात आलं. पण काहींच्या मते ही 'समज' म्हणजे या चौघाही तरुणांना चाबकाने फोडून काढण्यात आलं आणि आयुष्यात पुन्हा कधीही असं करणार नाही, म्हणून त्यांच्याकडून कबुली घेण्यात आली.
ही घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते आहे. अनेकांनी अफगाणिस्तान आणि उत्तर कोरियाचे वाभाडे काढले आहेत. उत्तर कोरियात तर यासंबंधीचे कायदे आणखीच कडक आहेत. तिथे परदेशी चित्रपट, सीडी, व्हिडीओ पाहिल्यास पाच ते १५ वर्षांची शिक्षा आहे. त्यांचं वितरण केलं तर 'गुन्हगारांना' थेट जन्मठेप किंवा मृत्युदंडाचीही शिक्षा दिली जाते.