भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 06:08 IST2025-10-09T06:08:10+5:302025-10-09T06:08:31+5:30
एका पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मंगळवारी त्यांनी हे विधान केले.

भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
इस्लामाबाद : भारताबरोबर युद्ध होण्याची शक्यता आहे व त्यामुळे पाकिस्तान सतर्क असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे, असा दावा पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला. भविष्यात या दोन देशांमध्ये संघर्ष झाला तर पाकिस्तान युद्धात मोठे यश मिळवेल, अशी दर्पोक्तीही त्यांनी केली.
एका पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मंगळवारी त्यांनी हे विधान केले. भारतातील राजकीय नेते व लष्करी अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या वक्तव्यांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, भारताबरोबर युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सहा महिन्यांपूर्वी जी स्थिती होती, ती आता राहिलेली नाही. पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या मित्रदेशांत वाढ झाली आहे; तर भारताने त्याचे काही समर्थक गमावले आहेत. (वृत्तसंस्था)
हवाई दलाने सुरक्षाविषयक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राहावे सदैव सज्ज
हिंडन : भारतीय हवाई दलाच्या जवानांनी सुरक्षाविषयक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सदैव सज्ज राहिले पाहिजे, असे हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी बुधवारी सांगितले. ९३ व्या हवाई दल दिनानिमित्त त्यांनी उत्तर प्रदेशातील हिंडन येथील हवाई दल तळावर जवानांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, काहीच दिवसांत युद्धाचे स्वरूप कसे बदलता येते, हे आम्ही ऑपरेशन सिंदूरद्वारे जगाला दाखवून दिले. आम्ही शत्रूंच्या तळांवर अचूक हल्ले केले.