"महान शांतिदूत म्हणून माझी ओळख व्हावी"; 'होर्मुझ' सर्वांना खुली केल्यासच इराणशी करार- ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 08:03 IST2026-03-29T08:02:41+5:302026-03-29T08:03:22+5:30
वॉशिंग्टन : गेल्या वर्षी भारत-पाकिस्तानमधील संघर्षासह आठ युद्धे थांबविल्यामुळे माझी ओळख सर्वांना एक महान शांतिदूत म्हणून व्हायला हवी, अशी ...

"महान शांतिदूत म्हणून माझी ओळख व्हावी"; 'होर्मुझ' सर्वांना खुली केल्यासच इराणशी करार- ट्रम्प
वॉशिंग्टन : गेल्या वर्षी भारत-पाकिस्तानमधील संघर्षासह आठ युद्धे थांबविल्यामुळे माझी ओळख सर्वांना एक महान शांतिदूत म्हणून व्हायला हवी, अशी इच्छा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांना पुन्हा खुली करा या अटीवरच इराणशी कोणताही करार होऊ शकतो. तेल वाहतुकीसाठी हा सागरी मार्ग पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे.
मियामी येथे एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, पश्चिम आशियातील स्थितीबाबत आम्ही सध्या काही जणांशी चर्चा करत आहोत. त्यातून काही निष्पन्न झाले तर उत्तमच आहे. मी आर्मेनिया-अझरबैजान, काँगो-रवांडा, कंबोडिया थायलंड, इजिप्त-इथिओपिया, सर्बिया -कोसोव्हो तसेच इस्रायल-हमास यांच्यातील संघर्ष थांबवण्यात भूमिका बजावली. मी एक शांतिदूत आहे. मी भारत व पाकमधील संघर्षही थांबवला. त्या दोन्ही देशांना मी सांगितले की तुम्ही लढाई सुरू ठेवली तर मी दोघांवर २५० टक्के आयात शुल्क लावेन.
'हल्ला केला नसता तर इराणने अण्वस्त्रे बनविली असती' ट्रम्प यांनी सांगितले की, नाटो हा कागदी वाघ आहे. आम्ही त्यांना मदत करतो, पण ते आम्हाला सहकार्य करत नाहीत. अमेरिकेने इराणवर हल्ला केला नसता तर त्या देशाने दोन ते चार आठवड्यांत अण्वस्त्रनिर्मिती केली असती व त्याचा इसायलसह अन्य देशांविरोधात वापर केला असता.
क्षेपणास्त्रांचे अवशेष कोसळून ५ भारतीय जखमी
दुबई : यूएईच्या हवाई संरक्षण प्रणालीने एक क्षेपणास्त्र निकामी केल्यानंतर त्याचे अवशेष खलिफा इकॉनॉमिक झोन अबू धाबी (केइझेडएडी) परिसरात शनिवारी पडून पाच भारतीय जखमी झाले, अशी माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली. अबू थाबी मीडिया ऑफिसने सोशल मीडियावरील लिहिलेल्या पोस्टमध्येही या घटनेला दुजोरा दिला आहे
जखमी झालेल्या पाच भारतीयांपैकी कोणाचीही प्रकृती चिंताजनक नसल्याचे सांगण्यात आले. हवाई संरक्षण प्रणालीने शत्रू देशाची क्षेपणास्त्र निकामी केल्यानंतर त्याचे अवशेष जमिनीवर पडतात. अशाच घटनांमुळे केइझेडएडी या परिसरात दोनदा आग लागली.