भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 07:20 IST2025-08-10T07:20:46+5:302025-08-10T07:20:46+5:30
हस्तक्षेप केला नसता तर दोन्ही देशांतील संघर्षाचे रूपांतर आण्विक युद्धात झाले असते

भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
वॉशिंग्टन : भारत-पाकिस्तान या देशात चार दिवसांपासून सुरू असलेले युद्ध मीच थांबवल्याचा दावा पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
हस्तक्षेप केला नसता तर दोन्ही देशांतील संघर्षाचे रूपांतर आण्विक युद्धात झाले असते, अशी भीती हॉइट हाउसमध्ये ट्रम्प यांनी व्यक्त केली. या संघर्षात पाच विमाने पाडली गेल्याच्या दाव्याची त्यांनी पुनरावृत्ती केली. मात्र, ती विमाने कोणत्या देशाची होती याबद्दल त्यांनी कोणतेही विधान केले नाही.
‘...तर आण्विक युद्धाचा भडका’
भारत व पाक एकमेकांविरोधात पूर्ण शक्तिनिशी लढत होते. कोणत्याही क्षणी आण्विक युद्धाचा भडका उडाला असता. मात्र, त्याआधीच दोन्ही महान नेते एकत्र आले व त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. मी व्यापाराच्या माध्यमातून संघर्षावर तोडगा काढत आहे. मी भारत व पाकिस्तानमधील संघर्ष थांबवला. इतर कारणापेक्षा व्यापार हे त्या देशांतील संघर्ष थांबण्यामागील मुख्य कारण असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
युद्ध थांबवण्यासाठी पुतीन यांना भेटणार
रशिया व युक्रेन यांच्यातील संघर्ष थांबवणार असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. दोन्ही देशांतील युद्ध थांबवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची शुक्रवारी अलास्का येथे भेट घेणार आहे. १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीची सविस्तर माहितीनंतर देणार असल्याचे सोशल मीडियाद्वारे ट्रम्प यांनी
स्पष्ट केले.