इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:16 IST2025-06-17T16:12:39+5:302025-06-17T16:16:51+5:30
Israel-Iran conflict : इराणच्या दूतावासाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात इस्रायलवर गंभीर आरोप केले आहेत.

इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या दूतावासाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात इस्रायलवर गंभीर आरोप केले आहेत. दूतावासाच्या म्हणण्यानुसार, १३ जून रोजी इस्रायलनेइराणच्या प्रादेशिक अखंडतेचे आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे उल्लंघन करत अनेक ठिकाणी, विशेषतः निवासी भागांत लष्करी हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये महिला आणि मुलांसह तब्बल २२४ नागरिकांचा मृत्यू झाला असून १२५७ जण जखमी झाले आहेत.
काय आहेत इराणचे आरोप?
इराणच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने त्यांच्या हद्दीत घुसून हल्ला केला, जो आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात आहे. कोणत्याही देशावर हल्ला करण्यास मनाई करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचे (कलम २ (४)) इस्रायलने उल्लंघन केले आहे, असे इराणने म्हटले आहे. आपल्या संरक्षणासाठी योग्य ती कारवाई करण्याचा अधिकार आम्हाला आहे, असेही इराणने स्पष्ट केले आहे.
दूतावासाने निवेदनात म्हटले की, इराण अमेरिकेशी अणुबॉम्बसंबंधी चर्चा करत असताना इस्रायलने हे हल्ले केले. इराणने जगातील सर्व देशांना या हल्ल्यांचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, इस्रायलमुळे जगभरात शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
इस्रायलवर अणुबॉम्ब आणि युद्धाचे आरोप
इराणने इस्रायलवर अणुबॉम्ब बनवण्याचा आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीला (IAEA) माहिती न देण्याचा आरोपही केला आहे. इतकेच नाही, तर इस्रायलने इराणच्या अणु-केंद्रांवर हल्ला केला आणि त्यांच्या शास्त्रज्ञांना तसेच प्राध्यापकांना मारले, असेही इराणचे म्हणणे आहे. या हल्ल्यांच्या बदल्यात इराणच्या सैन्याने इस्रायलच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला केला, असेही निवेदनात नमूद केले आहे.
इराणने इस्रायलला मध्य पूर्वेतील अशांतता आणि युद्धाचे मुख्य कारण ठरवले आहे. ही राजवट सतत आपल्या शेजारील देशांवर हल्ले करते आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करत नाही, असे इराणचे म्हणणे आहे. या प्रकरणी इस्रायलने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.