बोंडी बीच नरसंहारानंतर दुसऱ्यांदा सिडनी हादरवण्याचा कट? ७ संशयित पोलिसांच्या जाळ्यात; ऑस्ट्रेलिया हाय अलर्टवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 20:17 IST2025-12-18T19:56:42+5:302025-12-18T20:17:52+5:30
सिडनी दहशतवादी हल्ल्याच्या जखमा ताज्या असतानाच नवा कट रचला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

बोंडी बीच नरसंहारानंतर दुसऱ्यांदा सिडनी हादरवण्याचा कट? ७ संशयित पोलिसांच्या जाळ्यात; ऑस्ट्रेलिया हाय अलर्टवर
Bondi attack: ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील बोंडी बीचवर १५ जणांचा बळी घेणाऱ्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या जखमा ताज्या असतानाच, गुरुवारी ऑस्ट्रेलियन पोलिसांनी एका मोठ्या हिंसक कृत्याचा कट उधळून लावला. सिडनीच्या लिव्हरपूलमध्ये पोलिसांनी दोन कार अडवून ७ संशयितांना ताब्यात घेतले. हे सर्व संशयित पुन्हा एकदा बोंडी बीचच्या दिशेने जात होते, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे.
पोलिसांची थरारक ॲक्शन
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर, पूर्ण लष्करी गणवेशातील टॅक्टिकल ऑपरेशन्स ऑफिसर्सनी सिडनीच्या रस्त्यावर दोन कारचा पाठलाग केला. पोलिसांनी संशयितांची पांढऱ्या रंगाची ह्युंदाई हॅचबॅक गाडी जोरात धडक देऊन थांबवली, तर दुसरी कार घेराव घालून रोखली. मेलबर्नहून आलेले हे सातही जण बोंडी बीचकडे निघाले होते, असा दावा ऑस्ट्रेलियन मीडियाने केला आहे.
बोंडी बीच हल्ल्याशी संबंध काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक मोठे हिंसक कृत्य घडवण्याची योजना आखली जात असल्याची टीप मिळाली होती. त्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मात्र, या ७ जणांचा रविवारच्या बोंडी बीच दहशतवादी हल्ल्याशी थेट संबंध आहे का, याचा तपास अजून सुरू आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियात आणखी मोठे छापे टाकले जाण्याची शक्यता फेडरल पोलीस कमिशनर क्रिसी बॅरेट यांनी वर्तवली.
रविवारच्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार भारतीय वंशाचा?
रविवारी झालेल्या इसिस प्रेरित हल्ल्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य हल्लेखोर साजिद अक्रम हा मूळचा भारतातील हैदराबाद येथील असून त्याने तिथून बी.कॉम पदवी घेतली होती. १९९८ मध्ये तो ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला होता. साजिदने गेल्या महिन्यात फिलिपाइन्सचा प्रवास करण्यासाठी भारतीय पासपोर्टचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तिथे त्याने कट्टरपंथी उपदेशकांची भेट घेतली आणि लष्करी प्रशिक्षण घेतल्याचा संशय आहे.
साजिदचा मुलगा नवेद हा देखील या हल्ल्यात सामील होता. तो सध्या जखमी अवस्थेत रुग्णालयात असून त्याच्यावर दहशतवाद आणि हत्येचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१० वर्षांच्या मुलीसह १५ जणांची हत्या
रविवारी झालेल्या हल्ल्यात साजिद आणि नवेदने ज्यू समुदायाच्या हनुका उत्सवाला लक्ष्य केले होते. यामध्ये एका १० वर्षांच्या चिमुरडीसह ८७ वर्षांच्या होलोकॉस्टमधून वाचलेल्या वृद्धाचाही मृत्यू झाला. सिरीयाहून आलेल्या अहमद अल अहमद या फळविक्रेत्याने जीवाची पर्वा न करता एका दहशतवाद्याला निशस्त्र केले, ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचले.
पंतप्रधान अल्बेनीज यांचा इशारा
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बेनीज यांनी या हल्ल्याला ज्यू-विरोध आणि दहशतवाद असे म्हटले आहे. देशात द्वेषयुक्त भाषणांविरुद्ध कडक कायदा आणणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.